scorecardresearch

कुर्ल्यातील इमारतीत भीषण आग ; वृद्ध महिलेचा मृत्यू

कुर्ला पश्चिमेकडील कोहिनूर सिटी परिसरात प्रीमियर संकुलातील इमारत क्रमांक ७ मध्ये  बुधवारी सकाळी ७ वाजता आग लागली.

70 year old woman dies in a fire at residential building
प्रातिनिधिक फोटो- लोकसत्ता

मुंबई : कुर्ल्यामध्ये एका १२ मजली इमारतीत बुधवारी सकाळी ७ वाजता भीषण आग लागली. चौथ्या मजल्यापासून दहावा मजल्यापर्यंत धुराचे लोट पसरल्यामुळे रहिवासी वेगवेगळ्या मजल्यांवर अडकून पडले होते. या दुर्घटनेत एका ७० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

हेही वाचा >>> मुंबई : ‘मेट्रो ३’चे ७९ टक्के काम पूर्ण, आरे ते बीकेसी टप्पा प्रगतीपथावर

कुर्ला पश्चिमेकडील कोहिनूर सिटी परिसरात प्रीमियर संकुलातील इमारत क्रमांक ७ मध्ये  बुधवारी सकाळी ७ वाजता आग लागली. ही इमारत एचडीआयएल निवासी संकुलापासून जवळ आहे. या इमारतीच्या चौथ्या मजल्यापासून दहाव्या मजल्यापर्यंत धूर पसरला होता. त्यामुळे रहिवासी वेगवेगळ्या मजल्यांवर अडकून पडले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत इमारतीत अडकलेल्या रहिवाशांना सुखरूप गच्चीवर नेले. या दुर्घटनेत शकुंतला रामाणी (७०) यांचा मृत्यू झाला.

या दुर्घटनेत गच्चीवर अडकलेल्या सर्व रहिवाशांना जिन्यावरून सुखरूप खाली आणण्यात अग्निशमन दलाला यश आले असून आग विझवण्यात आली आहे. या दुर्घटनेत गुदमरल्यामुळे नऊ जणांना त्रास झाला होता. त्यापैकी एका महिलेचा मृत्यू झाला असून अन्य आठ जण राजावाडी रुग्णालयात दाखल आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-02-2023 at 12:15 IST