मुंबई : शारीरिक, मानसिक त्रासाला कंटाळून मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील ७२ लोको पायलट (मेल) यांनी स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेतला. एकाचवेळी ७२ जणांनी मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना पत्र लिहून, स्वेच्छानिवृत्तीला मंजुरी देण्याची मागणी केली आहे.

प्रशासकीय दबाव, छळ केला जात असल्याने सर्व लोको पायलट तणावात आणि निराशाजनक वातावरणात काम करत आहेत. त्यामुळे मानसिक शांतता, निर्णय घेण्याची क्षमता आणि कार्यालयीन कामावर परिणाम होत आहे. अनियमित कर्तव्ये, असुविधा, प्रशासकीय संवेदनशीलतेच्या अभाव यांचा एकत्रित परिणाम शारीरिक, मानसिक ताण वाढविणारा आणि कौटुंबिक जीवन बिघडवणारा ठरत आहेत. वारंवार ताणतणावाला सामोरे गेल्याने आरोग्यासाठी हानिकारक ठरत आहे. त्यामुळे स्वेच्छानिवृत्ती घेण्यासाठी लोको पायलट एकवटले आहेत.

लोको पायलटच्या अडचणी काय ?

लोको पायलट यांना विश्रांती गृहामध्ये पुरवले जाणारे अन्न बहुतेकवेळा निकृष्ट दर्जाचे असते. विश्रांतीगृहात स्वच्छता, योग्य देखभाल आणि आवश्यक सुविधांचा अभाव आहे. ज्यामुळे लोको पायलट यांना कामानंतर आराम करता येत नाही. विश्रांतीगृहात योग्य प्रकाशयोजना नसल्याने रात्रीच्यावेळी किंवा प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीत गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच त्यांच्या मनात असुरक्षेची भावना निर्माण होते.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात सुमारे २४० मेल लोको पायलट कार्यरत आहेत. तर, सुमारे २३० पदे रिक्त आहेत. रिक्त पदामुळे कर्तव्यावरील जादा काम करावे लागते. तसेच मेल चालविताना लोको पायलटकडून अनेकदा नकळतपणे सिग्नलचे नियम मोडले जातात. निश्चित थांबा ओलांडला जातो, सिग्नल पास एट डेंजर (एसपीएडी) असे प्रकार घडतात. सिग्नलबाबत चुकांसाठी रेल्वे प्रशासनाकडून सक्तीची निवृत्ती (सीआरएस)ची कारवाई केली जाते. काहीवेळा वेतनात कपात केली जाते. तसेच त्यांच्या पदाची श्रेणी कमी केली जाते. त्यामुळे सेवनिवृत्तीच्यावेळी त्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होते. वयाच्या ५० वर्षांपुढील लोको पायलट स्वेच्छानिवृत्ती घेण्यासाठी इच्छुक आहेत, असे एका लोको पायलटने सांगितले.

भारतीय रेल्वेला दीर्घकाळ प्रामाणिक, शिस्तबद्ध आणि समर्पित सेवा दिल्यानंतर, आमच्या आरोग्य, सुरक्षितता, प्रतिष्ठा आणि एकूणच कल्याणावर गंभीर परिणाम करणाऱ्या सततच्या, पद्धतशीर आणि निराकरण न झालेल्या समस्यांमुळे स्वेच्छानिवृत्तीच्या निर्णयावर पोहोचण्यास भाग पडले आहे. हे मुद्दे वारंवार निवेदन आणि तोंडी संवादाद्वारे संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. परंतु कोणतीही सकारात्मक आणि कायमस्वरूपी उपाययोजना अंमलात आणली गेली नाही. त्यामुळे एकाचवेळी स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्याचे मत ७२ लोको पायलट यांनी मध्य रेल्वे प्रशासनाला निवेदनाद्वारे कळविले.

सिग्नल पास एट डेंजर (एसपीएडी) प्रकरणांमधील मोटरमन, लोको पायलट यांना मूळ वेतनांच्या ३० टक्के वेतन भत्ता न देण्याबाबत रेल्वे मंडळाची नकार घंटा कायम आहे. ज्या कर्तव्यांसाठी मोटरमन, लोको पायलट पात्र नाहीत, त्यांच्याशी संबंधित आर्थिक फायदा मिळत राहिला. तर, सिग्नल पासिंगला प्रोत्साहन दिले जाईल आणि परिणामी, रेल्वे सेवेच्या सुरक्षेवर परिणाम होईल, असे म्हणणे २८ ऑक्टोबर २०२५ च्या पत्रात रेल्वे मंडळाने मांडले आहे.