मुंबई : मुंबईतील दैनंदिन करोना रुग्णसंख्येत सोमवारी थोडीशी घट झाली. दिवसभरात ७४ नवीन रुग्णांची नोंद झाली. या रुग्णांपैकी ७२ रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत, तर केवळ २ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. रुग्णांना लक्षणे नसली तरी रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे रुग्णवाढीचा दर वाढला असून रुग्णदुपटीचा कालावधी कमी झाला आहे. तसेच उपचाराधीन रुग्णांची संख्याही वाढली आहे.

मुंबईत करोना रुग्णांची संख्या हळूहळू पुन्हा वाढू लागली असून दर दिवशी शंभर ते दीडशेच्या पुढे नवीन रुग्णांची नोंद होते आहे. मात्र रविवारी चाचण्या कमी झाल्यामुळे दिवसभरात केवळ ७४ रुग्णांची नोंद झाली. मात्र यापैकी ७२ रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. २ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. तर दिवसभरात ६३ रुग्ण करोनामुक्त झाले. गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्या वाढल्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्याही वाढू लागली असून सध्या ८९६ रुग्ण उपचाराधीन आहेत.

आतापर्यंत बाधित झालेल्यांची संख्या १० लाख ६१ हजारांवर गेली आहे. करोनामुक्त रुग्णांचे प्रमाण ९८ टक्क्यांवर स्थिरावले आहे. तर रुग्णवाढीचा दर वाढून ०.०१२ टक्के झाला आहे. तर रुग्णदुपटीचा कालावधी आणखी घसरला असून १६ हजारांवरून साडेपाच हजार दिवसांवर आला आहे. मुंबईतील चाचण्यांचे प्रमाणही हळूहळू वाढू लागले आहे. दिवसभरात आठ ते दहा हजार चाचण्या केल्या जातात. मात्र रविवारी ४,७०० चाचण्या करण्यात आल्या होत्या. मुंबईतील करोना रुग्णांसाठीच्या एकूण रुग्णशय्यांपैकी केवळ ०.११ टक्के खाटा व्यापलेल्या आहेत. म्हणजेच सध्या २४ हजार खाटांपैकी केवळ २८ खाटा व्यापलेल्या आहेत.