विलेपार्ले येथे राहणाऱ्या विना गोवर्धनदास कपूर या ७४ वर्षांच्या महिलेची तिच्याच मुलाने हत्या करून तिचा मृतदेह माथेरानच्या दरीत फेकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जुहू पोलिसांनी हत्येसह पुरावा नष्ट केल्याप्रकरणी आरोपी मुलासह त्याला मदत करणाऱ्या नोकराला अटक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सचिन गोवर्धनदास कपूर (४३) आणि छोटू ऊर्फ लालूकुमार मंडल (२५) अशी या दोघांची नावे आहेत. मालमत्तेच्या वादातून सचिनने त्याच्या आईची हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. विना कपूर ही महिला विलेपार्ले येथील जुहू, किशोरकुमार गार्डनजवळील गुलमोहर रोड क्रमांक पाचच्या गरीबदास (कल्पतरु) सोसायटीमध्ये राहत होत्या. त्यांचा मोठा मुलगा अमेरिकेत वास्तव्यास आहे तर लहान मुलगा सचिन हा त्यांच्यासोबत राहात होता. गेल्या काही दिवसांपासून विना आणि सचिन यांच्यात मालमत्तेवरून प्रचंड वाद सुरू होता. हा वाद सध्या न्यायालयात सुरू असून खटल्याची एक प्रत विना कपूर यांनी सोसायटीला दिली होती. सोसायटीचा सुरक्षा पर्यवेक्षक जावेद अब्दुल्ला मापारी यांनी विना कपूर या बेपत्ता असल्याची तक्रार जुहू पोलिसांत मंगळवारी केली होती. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती.

हेही वाचा: तृतीयपंथीयांना नोकरीची संधी डावलता येणार नाही; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले

या घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी केलेल्या तपासणीत विनासह सचिनचे मोबाईल लोकेशन काढले असता विना यांचे लोकेशन त्यांच्या राहत्या घरी तर सचिनचे लोकेशन पनवेल येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी सोसायटीतील सीसीटिव्हीचे चित्रीकरण ताब्यात घेतले होते. त्यावेळी सचिन व त्याचा नोकर छोटू हे विलेपार्ले येथील माऊली इमारतीच्या सदनिका क्रमांक २०३ मध्ये लपले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तेथे छापा टाकून या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत सचिनने त्याच्या आईशी मालमत्तेचा वाद झाल्याचे सांगून रागाच्या भरात तिला हाताने बेदम मारहाण केल्याचे तसेच बेसबॉलच्या बॅटने हल्ला करून तिची हत्या केल्याची कबुली दिली.

हेही वाचा: नेत्यांकडे स्वत:ची मते, व्यासंग असावा – देवेंद्र फडणवीस

हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने छोटूची मदत घेतली होती. विना यांचा मृतदेह एका खोक्यात भरून तो माथेरानच्या दरीत फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या दोघांच्या चौकशीतून उघडकीस आलेल्या माहितीनंतर पोलिसांनी हत्येसह हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला. याच गुन्ह्यांत बुधवारी दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. विना यांच्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी जुहू पोलिसांचे एक विशेष पथक माथेरानला रवाना झाले होते. विना यांचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठविण्यात येाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 74 year old woman killed son in vileparle attempt destroy evidence by throwing the body matheran valley crime mumbai print news tmb 01
First published on: 08-12-2022 at 09:27 IST