मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून मुंबईत शुक्रवारी ७६३ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली. शुक्रवारी शहरात शून्य मृत्युची नोंद झाली आहे. नव्या ७६३ रुग्णांपैकी ७२६ जणांना कोणतीही लक्षणे नाहीत. रुग्णालयात शुक्रवारी दाखल करण्यात आलेल्या ३७ रुग्णांपैकी केवळ एकाच रुग्णाचीच स्थिती गंभीर आहे. दिवसभरात ३५२ रुग्ण बरे झाले आहेत. पालिकेकडून एकूण ९ हजार ८९६  करोना चाचण्या करण्यात आल्या. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९८ टक्के कायम आहे.

सध्या एकही झोपडपट्टी, चाळ, इमारत प्रतिबंधित करण्यात आलेली नाही. करोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा २४ तासांत शोध घेण्यात येतो. रुग्णांच्या संपर्कातील ६०९८ जणांचा शोध घेण्यात आला. मुंबईत एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १० लाख ६८ हजार ८ वर पोहोचली आहे, तर करोनामुळे आतापर्यंत १९ हजार ५६७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १० लाख ४४ हजार जणांनी करोनावर मात केली आहे. मुंबईत एकूण तीन हजार ७३५ उपचाराधीन रुग्ण आहेत.

राज्यात ११३४ नवे रुग्ण, तीन जणांचा मृत्यू

मुंबई : राज्यातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून राज्यात शुक्रवारी ११३४ नवीन करोना रुग्ण आढळले आहेत. तर तीन करोनाबाधित रुग्ण दगावले. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. शुक्रवारी तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. गुरुवारी ५६३ रुग्ण बरे झाले असून रुग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाण ९८.०७ टक्क्यांवर पोहोचले आहे. रुग्णसंख्या, मृत्यू वाढत असतानाच राज्यातील उपचाराधीन रुग्णही वाढत आहेत. मंगळवारी ३४७५ रुग्ण राज्यात सक्रिय होते. यात वाढ होऊन शुक्रवारी त्यांची संख्या ५१२७ वर पोहचली आहे.