मुंबई : ठाणे वनविभागाने इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडच्या जंगलात आढळणाऱ्या सियामंग गिबन्स माकडांच्या तस्करीप्रकरणी रविवारी कुलाबा येथे केलेल्या कारवाईत ८ माकडे मृतावस्थेत तर १ जिवंत माकड जप्त केले आहे. याप्रकरणी मलेशियन नागरिकत्व असणाऱ्या एका महिलेला वन विभागाने ताब्यात घेतले आहे. दरम्यान, मुंबई विमातळावरून ही माकडे दक्षिण मुंबईत कशी पोहोचली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कुलाबा येथील हॉटेल जनतामध्ये सियामंग गिबन्सची तस्करी होणार असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यात परदेशी महिला तसेच चेन्नईतील एका व्यक्तीचा संबंध असल्याचे कळले होते. मिळालेल्या माहितीच्या आधारे रविवारी कुलाबा येथील हॉटेलमध्ये कारवाई केली असता वन कर्मचाऱ्यांना ४ सियामंग गिबन्स प्रजातीची, ३ गोल्डन गिबन्स आणि २ पिगटेल माकडे आढळली. त्यातील ८ माकडे मृतावस्थेत होती, तर १ पिगटेल माकड जिवंत सापडल्याची माहिती वन विभागाने दिली.

याप्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम,१९७२चा भंग केल्याप्रकरणी दोन्ही आरोपींवर वन गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना ७ दिवसांची कोठडी सुनावली आहे. त्याचबरोबर न्यायालयाने याप्रकरणी तपास करण्याचे आदेश वनविभागाला दिले आहेत.

लुप्तप्राय प्रजाती

गिबन्स हे लुप्तप्राय प्रजातींच्या यादीत आहे. त्याचा समावेश आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्याच्या परिशिष्ट १ आणि वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ च्या अनुसूचीमध्ये संरक्षित प्रजाती आहेत. दुर्मीळ आणि धोक्यात असलेली ही प्रजाती प्रामुख्याने अग्नेय आशियातील काही भागात आढळते आणि आंतरराष्ट्रीय वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत त्यांना संरक्षण देण्यात आले आहे.

सर्वात मोठे गिब्बन

गिबन प्रजातींच्या माकडांपैकी सियामंग हे सर्वांत मोठे असते. सिम्फॅलॅंगस वंशातील ही एकमेव प्रजाती आहे. सियामंगच्या दोन उपप्रजाती आहेत. त्यात सुमात्रन सियामंग आणि मलेशियन सियामंग या प्रजातींचा समावेश आहे. तस्करीमुळे सियामंग ही प्रजाती धोक्यात आली आहे. य़ाचबरोबर इंडोनेशिया आणि मलेशिय या दोन्ही देशांमध्ये त्यांचा अधिवासही नष्ट होत चालला आहे. सियामंगचे केस लांब, दाट असतात. सियामंगची सरासरी लांबी ९० सेमी असते. सियामंग प्रामुख्याने आहार म्हणून जंगलातील विविध वनस्पती खातात. त्यांच्या आहारात ६० टक्के फळांचा समावेश असतो. त्यांचा मुख्य अन्नस्रोत अंजीर आहे. सियामंग प्रामुख्याने इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडच्या जंगलात आढळतात.

सियामंग गिबन्स ही प्रजाती वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ च्या अनुसूचीमध्ये संरक्षित आहे. त्याची दखल घेणे गरजेचे आहे. ठराविक प्राणी त्याच्या अधिवासात सुरक्षितच असतो. त्याचबरोबर ही प्रजाती लुप्तप्राय यादीतही आहे. – सोनल वळवी, सहाय्यक वनसंरक्षक, ठाणे</p>