मृतांमध्ये डॉन बॉस्को महाविद्यालयाचे ७ विद्यार्थी

कुर्ला परिसरातील सिटी कोहिनूर मॉलसमोरील ‘सिटी किनारा’ हॉटेलमध्ये स्वयंपाकाच्या सिलिंडरमधून झालेल्या गॅस गळतीमुळे भीषण आग लागून एका महिलेसह आठ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये डॉन बॉस्को महाविद्यालयातील सात विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
कुर्ला (प.) येथील गुरुनाथ वर्दे मार्गावरील ‘सिटी किनारा’ हॉटेलला दुपारी १च्या सुमारास भीषण आग लागली. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. तळमजला आणि पहिला मजला अशी रचना असलेल्या ‘सिटी किनारा’ची रचना आहे. हॉटेलचा पहिला मजला आगीने वेढला होता. हॉटेलमागील रामेश्वर सोसायटीला आगीची झळ बसण्याची चिन्हे निर्माण झाली होती. परंतु अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आगीवर नियंत्रण मिळविले. आग लागताच हॉटेल मालक आणि कर्मचाऱ्यांनी तेथून पळ काढला. मात्र भोजनासाठी आलेल्या आठ जणांना पहिल्या मजल्यावरून बाहेर पडता आले नाही. आगीमध्ये होरपळलेल्या या आठ जणांना तातडीने कुर्ला भाभा आणि खासगी रुग्णालयात नेण्यात आले. जखमींना राजावाडी रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मृतांमध्ये सात पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. मृतांमध्ये डॉन बॉस्को महाविद्यालयातील विद्यार्थी बर्नाटो डिसोझा, एरवीन डिसोझा, साजिद चौधरी, बरिन फर्नान्डो, ताहा शेक, शारजील शेख, आकाश थापर आणि अरविंद कनोजिया यांचा समावेश आहे. मृतांची ओळख पटल्याचे पोलीसांनी सांगितले.

सिलिंडर वर, शेगडी खाली
दुपारच्या सुमारास चायनीज पदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी या हॉटेलमध्ये खवय्यांची गर्दी असते. हॉटेलच्या तळमजल्यावर मुदपाकखाना आणि वरच्या मजल्यावर खवय्यांची बसण्याची व्यवस्था होती. वरच्या मजल्यावर एक रिकामा आणि दोन भरलेले गॅस सिलिंडर ठेवण्यात आले होते. भरलेले गॅस सिलिंडर पाइपच्या साहाय्याने तळमजल्यावरील शेगडीला जोडण्यात आले होते. या पाइपमधून गॅसची गळती झाल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाने व्यक्त केला आहे.