चार जणांचे मृतदेह सापडले, चौघांचा शोध सुरू; पूरस्थिती ओसरली
अलिबाग : अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती मंगळवारी ओसरली, मात्र या पूरस्थितीत जिल्ह्यातील आठ जण वाहून गेल्याची बाब समोर आली. पनवेल ३, खालापूर २, माणगाव, म्हसळा आणि कर्जत येथील प्रत्येकी एक असे एकूण आठ जण पुरात वाहून गेले आहेत. यापैकी चौघांचे मृतदेह सापडले असून इतर चार जणांचा शोध सुरू आहे.

म्हसळा तालुक्यातील मैंदडी येथे सुरेश कोळी मासेमारीसाठी खाडीत गेला होता. बोट उलटल्याने तो वाहून गेला. त्याचा मृतदेह सोमवारी रात्री सापडला. कर्जत तालुक्यातील देवपाडा येथे प्रमोद जोशी हा तरुण पोशीर नदीच्या प्रवाहात वाहून गेला. त्याचा शोध सुरू आहे. पनवेल तालुक्यातील पोयजे येथे पाली बुद्रुक धरणावर पोहण्यासाठी गेलेला दीपक ठाकूर हा तरुण बुडाला होता. त्याचा मृतदेह मंगळवारी सापडला. तर पडगे येथील नदीच्या प्रवाहात प्रल्हाद ठाकूर आणि भाऊ  बन्सारी हे दोघे वाहून गेले. त्यांचा शोध अद्याप लागू शकलेला नाही. माणगाव तालुक्यातील माकटी येथील संगीता बडेकर या सायंकाळी गोद नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. पाय घसरून पडल्याने त्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या. स्थानिक बचाव पथकांना त्यांचा मृतदेह आढळून आला. खोपोलीतील क्रांतीनगर येथून वृषभ हंसीलकर आणि नीलम हंसीलकर हे बहीण भाऊ  नाल्याच्या प्रवाहात वाहून गेले. यापैकी नीलम हिचा मृतदेह महड येथे मंगळवारी सकाळी आढळून आला, तर वृषभचा शोध सुरू आहे.

दरम्यान अतिवृष्टीमुळे दरडी कोसळून विस्कळीत झालेली वाहतूक मंगळवारी सुरळीत करण्यात आली. माथेरान घाट, मुंबई-गोवा महामार्गावर सुकेळी खिंड, खालापूरजवळ माडप आणि दिघी माणगाव महामार्गावर कोसळलेली दरड हटविण्यात आली आहे. यानंतर हे सर्व मार्ग वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत.

तीन दिवस जोरधार…

जिल्ह्याला सलग तीन दिवस मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली होती. पाताळगंगा, आंबा, बाळगंगा, कुंडलिका आणि सावित्री नद्या दुथडी भरून वाहत होत्या. रस्ते वाहतूक विस्कळीत झाली होती. मंगळवारी सकाळनंतर पावसाचा जोर कमी झाल्याने पूरस्थिती ओसरली.