मुंबई भरधाव इनोव्हा कारने ८ वर्षाच्या मुलाला चिरडल्याची घटना घडली. या घटनेत हा मुलगा गंभीर जखमी झाला, ज्यानंतर त्याला जेव्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेव्हा त्या मुलाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. रविवारी दुपारी २ ते २.३० वाजण्याच्या सुमारास वांद्रे येथील मेहबूब स्टुडिओ समोर ही घटना घडली. या घटनेत कार चालक महिलेवर गुन्हा दाखल करुन तिला अटक करण्यात आली आहे. प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार ही महिला चालक कार चालवताना फोनवर बोलत असल्याने तिचे कारवरचे नियंत्रण चुकून तिने या मुलाच्या अंगावरुन कार नेली. कारचे चाक मुलाच्या छातीवरुन गेल्याने मुलगा अंश रवींद्र गुप्ता गंभीर जखमी झाला आणि त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत्यू घोषित केलं. या प्रकरणात कार चालक मेघा रावल हीला अटक करण्यात आली आहे.
नेमकी काय घटना घडली?
४५ वर्षीय मेघा रावल या इनोव्हा क्रिस्टा ही कार चालवत होत्या आणि फोनवर बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी एका आठ वर्षांच्या मुलाला उडवलं. अंश गुप्ता असं या ८ वर्षांच्या मुलाचं नाव असून त्याला रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. मेघा रावल या वांद्रे येथे नुट्रिशियनिस्ट म्हणून काम करतात. वांद्रे पश्चिमेलाच त्यांचं घर आहे. अपघातामुळे अंशला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याला तातडीने होली फॅमिली रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. अंश गुप्ताच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे. तसंच कार चालवणाऱ्या मेघा रावल यांना अटकही करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.
मेघा रावल यांच्यावर कुठल्या कलमान्वये गुन्हा दाखल?
पोलिसांनी मेघा रावल यांना अटक केली असून त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५, कलम २८१, कलम १२५ आणि मोटर व्हेईकल्स अॅक्टच्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी असं सांगितलं की आम्ही मेघा रावल यांना अटक केली आहे. आम्हाला असा संशय आहे की त्या फोनवर बोलत होत्या. त्याबाबत आम्ही प्रत्यक्षदर्शींशीही बोललो आहे. त्यांचंही हे म्हणणं आहे की त्या फोनवर बोलत गाडी चालवत होत्या. त्याच नादात त्यांनी अंशवर गाडी घातली आणि त्याला चिरडलं. या प्रकरणी आम्ही पुढील तपास करत आहोत.”
प्रत्यक्षदर्शीने काय सांगितलं?
प्रत्यक्षदर्शीने सांगितलेल्या माहितीनुसार ३० ऑगस्टच्या दिवशी दुपारी २ च्या सुमारास ८ वर्षांचा मुलगा खेळत होता आणि तो रस्ता क्रॉस करायला गेला. तेवढ्यात इनोव्हाने त्याला चिरडलं. त्या इनोव्हाची चालक एक महिला होती आणि ती फोनवर बोलत होती. मेघा रावल या न्यूट्रिशियनिस्ट आणि हेल्थ कोच आहेत. तसंच त्या मेमाझो कँडी या हेल्थकेअर ब्रांडच्या संस्थापक आहेत. मेमाझो कँडी ही कंपनी फळांच्या खऱ्या अर्कापासून कँडी तयार करते.
