मेट्रो-तीन प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या ३०० चौ.फूटापेक्षा कमी क्षेत्रफळाच्या जागा असलेल्या नागरिकांना दुप्पट क्षेत्रफळाच्या जागा देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत केली. सुमारे ८० टक्के प्रकल्पग्रस्तांना याचा लाभ होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. तर ३०० चौ.फूटापेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या जागा असलेल्यांना सुयोग्य क्षेत्रफळाच्या पर्यायी जागा देण्यात येतील आणि सर्व प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन त्याच परिसरात होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मेट्रो प्रकल्पाला जोरदार विरोध होत असल्याने आणि मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला जाईल, असा प्रचार सुरु असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन केले. भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह अतुल भातखळकर व अन्य काही भाजप आमदारांनी मुख्यमंत्र्यांची याप्रश्नी भेटही घेतली. पुनर्वसनाचा आराखडा निश्चित झाल्याखेरीज कोणत्याही इमारतीतील रहिवाशांना बाहेर काढले जाणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.