दिवाळीनंतर वरळी, ना. म. जोशी आणि नायगावमधील चाळींचे पुनर्वसन

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत वरळी, ना.म. जोशी मार्ग आणि नायगावमधील पुनर्वसित इमारतीतील घरांसाठी मंगळवारी म्हाडा भवनात सोडत काढण्यात आली. ही सोडत यशस्वीपणे पार पडल्याने आता सोडतीत सहभागी झालेल्या पात्र रहिवाशांना दिवाळीनंतर संक्रमण शिबिरात हलविण्यात येणार आहे. त्यानंतर इमारती पूर्णत: रिकाम्या करून त्याजागी पुनर्वसित इमारतींच्या बांधकामास सुरुवात केली जाणार आहे.

वरळीत मोकळ्या जागेत

पुनर्वसित इमारतीचे काम वेगात सुरू आहे. मात्र ना.म. जोशी आणि नायगावमधील कामाला अजूनही सुरुवात झालेली नाही. या दोन्ही ठिकाणी बांधकाम करण्यास

मोकळी जागा नसल्याने टप्प्याटप्प्यात इमारती पाडून तेथे काम सुरू करण्याचा निर्णय मुंबई मंडळाने  घेतला होता. मात्र पात्रता निश्चितीस अनेक कारणांमुळे विलंब  झाल्याने रहिवाशांचे स्थलांतरित  करत इमारती रिकाम्या करून घेणे मंडळाला शक्य होताना दिसत  नव्हते. त्यामुळे कामासही विलंब झाला आहे. पण आता मात्र इमारती पाडण्याच्या कामाला सुरुवात करण्याचा मार्ग मोकळा झाला

आहे. कारण आता वरळीतील १६०, ना.म.जोशी मार्ग येथील ५०१ आणि नायगावमधील २२२ रहिवाशांची पात्रता निश्चित करण्यात आली  आहे.

तिन्ही ठिकाणच्या पुनर्वसित इमारतीतील एकूण ८८३ घरांसाठी सोडत काढून रहिवाशांना हक्काच्या घराची हमी मंगळवारी देण्यात आली. त्यामुळे बीडीडी चाळीतील या रहिवाशांची या घरातील ही शेवटची दिवाळी असणार आहे. सोडत पार पडल्याने आता या रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित करत इमारती मोकळ्या करून घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

त्यानुसार आता दिवाळीनंतर या ८८३ रहिवाशांचे स्थलांतर करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. रहिवाशांचे स्थलांतर केल्यानंतर संबंधित इमारती पाडून नंतर बांधकामाला सुरुवात  करण्यात येईल, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. एकूणच नव्या वर्षात ना.म.जोशी  आणि नायगावमधील पुनर्विकासाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.