मुंबई : परळ येथील वाडिया रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात (एनआयसीयू) मागील १४ दिवसांमध्ये ९ अर्भकांचा मृत्यू झाला. हे मृत्यू जंतुसंसर्गामुळे झाल्याचे कारण डॉक्टरांनी दिले आहे असे पालकांनी सांगितले.

वाडिया रुग्णालयामध्ये प्रसूती व नवजात बालकांसाठी अद्ययावत उपचार पद्धती उपलब्ध आहे. गेल्या दोन आठवड्यांमध्ये रुग्णालयाच्या एनआयसीयूमध्ये ९ अर्भकांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर २० ते २५ दिवस उपचार करताना पालकांकडून जवळपास ४ ते ५ लाख रुपये रुग्णालय प्रशासनाने वसूल केले. या सर्व बालकांना संसर्ग झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून पालकांना सांगण्यात आले.

शीव येथील रहिवासी असलेल्या महिलेची ६ नोव्हेंबर रोजी वाडिया रुग्णालयामध्ये प्रसूती झाली. सातव्या महिन्यामध्ये बाळ जन्माला आल्याने त्याला एनआयसीयूमध्ये ठेवण्यात आले. बाळाची प्रकृती सुधारण्यासाठी किमान एक ते दोन महिने लागतील. तसेच सात ते आठ लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे डाॅक्टरांनी समुपदेशन करताना पालकांना सांगितले. मात्र महिनाभरानंतर मध्यरात्री तीन वाजता बाळाला संसर्ग झाला असून, त्याला श्वास घ्यायला त्रास होत आहे. तसेच त्याच्या छातीमध्ये पाणी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर ८ डिसेंबर रोजी बाळाचा मृत्यू झाला. यादरम्यान रुग्णालयाचे ४ ते ५ लाख रुपये देयक, तर औषधांसाठी जवळपास १ लाख ८० हजार रुपयांहून अधिक खर्च झाला.

अपरात्री संमतीपत्रावर स्वाक्षरी

बाळाच्या प्रकृतीची माहिती त्याच्या पालकांना रात्री २ किंवा ३ वाजता अचानक बोलवून दिली जाते. ती देण्यापूर्वी बाळाची प्रकृती गंभीर असून, त्याला ठरावीक इंजेक्शन द्यायचे आहे, असे सांगत त्यांच्याकडून संमतीपत्रावर स्वाक्षरी घेण्यात येते. त्याचप्रमाणे रुग्णालयामध्ये रक्त, प्लेटलेट नसल्याने तातडीने बाहेरून आणण्यासही रात्रीच्या वेळीच सांगण्यात येत असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.

रुग्णालयात येणाऱ्या अनेक महिलांची आमच्याकडे नोंदणी झालेली नसते. अखेरच्या क्षणाला गुंतागुंत असलेली प्रकरणे आमच्याकडे येतात. एनआयसीयूमध्ये कोणतीही समस्या नाही. संसर्गामुळे बाळाचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी नातेवाईकांना दिली असेल तर त्याबाबत मला डॉक्टरांशी बोलावे लागेल. मी याबाबत अधिक बोलू शकत नाही. – डॉ. मिनी बोधनवाला, मुख्य कार्यकारी अधिकारी, वाडिया रुग्णालय