scorecardresearch

मुंबई: गोवंडीमध्ये धोक्याची घंटा; श्वसनाच्या आजाराने मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये ९ टक्के गोवंडीकर

देवनार कचराभूमी, एसएमएस कंपनी आणि सिमेंट मिक्सर प्रकल्प यामुळे दिवसेंदिवस गोवंडी परिसरात प्रदुषणाचा धोका वाढत आहे.

respiratory diseases
श्वसनाच्या आजाराने मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये ९ टक्के गोवंडीकर

वाढत्या प्रदुषणाचा स्थनिक रहिवाशांना मोठा धोका

समीर कर्णुक

देवनार कचराभूमी, एसएमएस कंपनी आणि सिमेंट मिक्सर प्रकल्प यामुळे दिवसेंदिवस गोवंडी परिसरात प्रदुषणाचा धोका वाढत आहे. परिणामी, या परिसरात वास्तव्यास असलेल्या अनेकांना श्वसनाच्या आजाराने ग्रासले आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये श्वसनाच्या आजाराने मृत्युमुखी पडलेल्यांपैकी नऊ टक्के नागरिक एकट्या गोवंडीतील आहेत.

हेही वाचा >>>सीबीआयने ‘वेकोलि’च्या अधिकाऱ्याला एक लाखाची लाच घेताना केली अटक

गेल्या अनेक वर्षांपासून देवनार कचराभूमीतून पसरणारी दुर्गंधी, प्रदुषण आणि त्यामुळे निर्माण होणारे आरोग्याचे प्रश्न याचा मुंबई महानगरपालिकेच्या एम पूर्व विभागाच्या हद्दीतील गोवंडी – शिवाजी नगर परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच २००९ मध्ये याच परिसरात रुग्णालयातील जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने प्रकल्प उभारला. एसएमएस कंपनीमार्फत हा प्रकल्प चालविण्यात येत आहे. या कंपनीत मुंबई शहर आणि उपनगरातील सर्व रुग्णालयांमधील जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येते. या कंपनीमधून मोठ्या प्रमाणात विषारी धूर हवेत सोडला जातो. याचा परिणाम येथील नागरिकांच्या आरोग्यावर झाला आहे. त्यामुळे ही कंपनी या परिसरातून हद्दपार करावी अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून वारंवार करण्यात येत आहे. या संदर्भात रहिवाशांनी महानगरपालिकेकडे तकारीही केल्या आहेत. तसेच रहिवाशांनी रस्त्यावर उतरून आंदोलनेही केली आहेत. मात्र तक्रार, आंदोलनांची दखल घेतली जात नसल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात येत आहे. गेल्या तीन – चार वर्षांत या परिसरामध्ये अनेक सिमेंट मिक्सर प्रकल्प उभारण्यात आले आहेत. लोकवस्तीजवळ या प्रकल्पांना बंदी असताना महानगरपालिकेच्या एम पूर्व कार्यालयाजवळ आणि इतर ठिकाणी अनेक अनधिकृत प्रकल्प उभे राहिले आहेत. या प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणात धूळ बाहेर पडत असल्याने, त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून यामुळे अनेकांना श्वसनाचे आजार होत आहेत.

हेही वाचा >>>वर्धा : लाजराबुजरा साळींदर रस्त्यावर उतरला, अन्…

कचराभूमी, एमएमएस कंपनीतू बाहेर पडणारा विषारी वायू आणि सिमेंट मिक्सर प्रकल्पांमधून बाहेर पडणारी धूळ यामुळे येथील बहुतांश नागरिकांना श्वसनाचे आजार झाले आहेत. त्यामुळे या ठिकाणी क्षय, दमा, डोळ्यांचा आजार आणि सर्दी-खोकल्याचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. मुंबईमध्ये २०१६ ते २०२१ या काळात अस्थमाने मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची माहिती मिळावी यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ते शेख फय्याज आलम यांनी मुंबई महानगरपालिकेच्या शिवडी क्षयरोग रुग्णालयात माहितीच्या अधिकाराअंतर्गत अर्ज केला होता. रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार या काळात अस्थमामुळे तब्बल सहा हजार ७५७ जणांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले. लहान मुले आणि वृद्धांना या प्रदुषणाचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ यावर तोडगा काढण्याची मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

अनेकांच्या घरात हवा शुद्ध करण्याचे यंत्र
दिवसेंदिवस या परिसरातील हवा दुषित होत आहे. त्यामुळे अनेकांनी आपल्या घरात, कार्यालयात हवा शुद्ध करणारी यंत्रे बसविली आहेत. मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कष्टकरी वर्ग राहत असल्याने अनेकांना हे यंत्र खरेदी करणे परवडत नाही. त्यामुळे सरकारने या परिसरात हवा शुद्ध करणारी मोठी यंत्रे बसवावीत, अन्यथा घरातील हवा शुद्ध करण्यासाठी स्वस्तात यंत्र उपलब्ध करावे, अशी मागणी रहिवाशांकडून होऊ लागली आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 12:00 IST