मुंबई : आपल्या प्रौढ हिंदू धर्मीय काळजीवाहकाला दत्तकपुत्र म्हणून स्वीकारण्याची मान्यता द्यावी या मागणीसाठी एका ९० वर्षांच्या निवृत्त पारसी स्त्रीरोगतज्ज्ञाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयानेही या वयोवृद्ध डॉक्टरच्या मागणीची दखल घेऊन त्यांनी केलेली मागणी मान्य केली जाऊ शकते का ? असा प्रश्न उपस्थित केला आणि केंद्र व राज्य सरकारला त्यावर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.
दीर्घकाळापासून हा काळजीवाहक आपल्यासोबत आहे आणि आपली सर्वतोपरी काळजी घेत आहे. तथापि तो हिंदू धर्मीय आणि प्रौढ आहे. याचमुळे त्याला दत्तक घेण्याची परवानगी न्यायालयाने आपल्याला द्यावी, असे बोम्सी वाडिया यांनी याचिकेत म्हटले आहे. भारतात कायदेशीररित्या दत्तक प्रक्रिया बाल-केंद्रित आहे. त्यामध्ये प्रौढ व्यक्तीला दत्तक घेण्याचा समावेश नाही. प्रौढ व्यक्तीला दत्तक घेण्याबाबत कायद्यामध्ये एक पोकळी आहे. तथापि, केवळ कायद्यातील त्रुटी किंवा उणिवांमुळे आपल्याला नाहक त्रास सहन करावा लागणे योग्य नसल्याचा युक्तिवाद वाडिया यांच्यातर्फे न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या खंडपीठापुढे नुकत्याच झालेल्या सुनावणीच्या वेळी करण्यात आला.
आलिशान बंगला, गाड्या आणि अनेक जागांचा मालकीहक्क असलेले वाडिया हे सुप्रसिद्ध वैद्यकीय स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. तसेच, या वयातही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ, निरोगी आहेत. वाडिया हे अविवाहित असून ते गेल्या अनेक वर्षांपासून एकटेच ऑपेरा हाऊस परिसरातील बंगल्यात वास्तव्यास आहेत. त्यांची एकमेव बहीण हयात नाही. तिला दोन मुली आणि एक मुलगा आहे. तथापि, १९९९ पासून राजीव झा हे वाडिया यांच्यासोबतच राहत असून त्यांची काळजी घेत आहेत. आता आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर असताना, त्यांचे नाव आणि वारसा पुढे चालवण्यासाठी एका प्रौढ व्यक्तीला दत्तक घेण्याची त्यांची इच्छा आहे, असेही वाडिया यांच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले.
वाडिया यांनी मृत्युपत्र तयार केले असून त्यात झा यांच्या नावे ”मुखत्यारपत्र” काढण्यात आले आहे. शिवाय, अन्य सर्व आवश्यक कागदपत्रेही झा यांच्याच नावे केली आहेत. परंतु, झा हे हिंदू असल्याने ऑगस्ट २०२५ मध्ये निबंधकांनी या दत्तक विधानाची नोंद करण्यास नकार दिला. ही कायदेशीर अडचण निर्माण झाल्याने वाडिया यांना न्यायालयाचे दार ठोठावावे लागत असल्याचेही न्यायालयाला सांगण्यात आले.
वाडिया कुटुंबीय नव्या समावेशास तयार
विशेष म्हणजे सुनावणीदरम्यान ९० वर्षांचे वाडिया हे जातीने न्यायालयात उपस्थित होते. त्यावेळी, वाडिया यांनी मृत्युपत्रात झा यांचे नाव आधीच समाविष्ट केले आहे. त्यामुळे, झा यांना दत्तक घेण्याची आवश्यकता वाडिया यांना का भासत आहे ? दत्तक घेतल्यानंतर झा हे वाडिया कुटुंबाचा भाग होतील का ? अशी
विचारणा न्यायालयाने केली. त्यावर, कायदेशीर अडचणीमुळे दत्तक प्रक्रियेसाठी याचिका केली गेली. तर झा हे विवाहित आहेत आणि त्यांना दोन लहान मुले आहेत. परंतु, या सगळ्यांना कुटुंबामध्ये समाविष्ट करण्यास सर्व वाडिया कुटुंबीय तयार असल्याचे वाडिया यांच्यातर्फे न्यायालयाला सांगण्यात आले.
सरकारचा विरोध
दरम्यान, वाडिया यांच्या युक्तिवादाला राज्य सरकारने विरोध केला. तसेच, वाडिया यांच्या अनेक मालमत्तांकडे न्यायालयाचे लक्ष वेधले व वाडिया यांचे पुतणे आणि त्यांच्या मृत्युपत्राचे अंमलबजावणी अधिकारी यांना या प्रकरणी पक्षकार बनवण्याची मागणी सरकारतर्फे करण्यात आली.
