scorecardresearch

ठाण्यात लवकरच ९०० खाटांचे रुग्णालय; जिल्हा रुग्णालयाच्या जुन्या इमारती पाडण्यास मान्यता

ठाणे येथील विठ्ठल सायन्ना सामान्य रुग्णालयाच्या (सिव्हिल हॉस्पिटल) जागेवर नवीन ९०० खाटांचे सुसज्ज रुग्णालय बांधण्यात येणार आहे.

ठाण्यात लवकरच ९०० खाटांचे रुग्णालय; जिल्हा रुग्णालयाच्या जुन्या इमारती पाडण्यास मान्यता
संग्रहित छायाचित्र

मुंबई : ठाणे येथील विठ्ठल सायन्ना सामान्य रुग्णालयाच्या (सिव्हिल हॉस्पिटल) जागेवर नवीन ९०० खाटांचे सुसज्ज रुग्णालय बांधण्यात येणार आहे. यासाठी येथील जुन्या १८ इमारती पाडण्यास राज्य शासनाने मान्यता दिली. १९३६ ते २०१५ या कालावधीत बांधण्यात आलेल्या या इमारती आहेत.

ठाणे येथील सध्याच्या ३२६ खाटांच्या रुग्णालयाच्या जागेवर ५०० खाटांचे जिल्हा रुग्णालय, २०० खाटांचे महिला व बाल रुग्णालय आणि २०० खाटांचे संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी), असे त्याचे श्रेणीवर्धन करण्याचा २२ सप्टेंबर २०२१ रोजी निर्णय घेण्यात आला होता. त्यात बदल करून ९०० खाटांचे जिल्हा रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालय व परिचारिका प्रशिक्षण केंद्र आणि वसतिगृह इमारत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी लागणाऱ्या ५२७ कोटी ४१ लाख १५ हजार ४८ रुपयांच्या सुधारित खर्चास मान्यता देण्यात आली. 

नव्या रुग्णालयाच्या उभारणीसाठी जुन्या रुग्णालयाच्या इमारती पाडणे आवश्यक असून आरोग्य विभागाने तसा प्रस्ताव मान्यतेसाठी २८ जुलै २०२२ रोजी राज्य शासनाकडे पाठविला होता. त्याला राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार जिल्हा रुग्णालयाच्या जागेवर असलेल्या रुग्णालयाशी संबंधित १८ इमारती पाडल्या जाणार आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या