लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : मढ ते वर्सोवा प्रवासाचा वेळ आणि अंतर कमी करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने हाती घेतलेल्या वर्सोवा – मढदरम्यान पुल बांधणीच्या प्रकल्पात अंदाजे १९०० कोटी रुपयांची वाढ झाल्याचा आरोप विरोधी पक्ष नेता रवी राजा यांनी बुधवारी केला. तसेच, केवळ दीड वर्षांच्या कालावधीत इतकी वाढ कशी होऊ शकते, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

मढ – वर्सोवा हे अंतर रस्तेमार्गाने पूर्ण करण्यासाठी जवळपास एक ते दीड तासांचा कालावधी लागतो. वाहतूककोंडी झाल्यास प्रवासाची वेळ आणखी वाढतो. मढ – वर्सोवादरम्यान फेरी बोटीनेही प्रवास करण्याची सुविधा आहे. मात्र, पावसाळ्यात आणि ओहोटीच्या वेळी फेरी बोट बंद असते. त्यामुळे प्रवाशांना रस्त्याने प्रवास करणे अपरिहार्य ठरते. त्यामुळे अनेक वर्षांपासून मढ – वर्सोवादरम्यान पूल बांधण्याची मागणी केली जात होती. त्यानंतर, २०२० मध्ये आवश्यक मंजुरी प्राप्त झाल्यानंतर महानगरपालिकेने वर्सोवा – मढदरम्यान पूल बांधणीचा प्रकल्प हाती घेतला. या प्रकल्पामुळे तासाभराचे अंतर केवळ दहा मिनिटात गाठणे शक्य होणार आहे. मात्र, या प्रकल्पाच्या खर्चात अवाढव्य वाढ झाल्याचा आरोप रवी राजा यांनी केला आहे. जानेवारी २०२३ मध्ये या प्रकल्पाचा खर्च २०३८ कोटी रुपये इतका होता. तो आता ३९९० कोटींच्या घरात पोहोचला आहे. म्हणजेच दीड वर्षांच्या कालावधीत १९०० कोटी रुपयांची वाढ झाली आहे, असा आरोप राजा यांनी समाजमाध्यमावरून केला आहे. महापालिकेकडून जनतेच्या पैशाची केवळ लूट सुरू असून दीड वर्षात प्रकल्पाच्या खर्चात ९५ टक्के वाढ कशी होऊ शकते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.