मुंबईतील ९६५ धार्मिक स्थळांवरील भोंगे बेकायदा ; पोलिसांचीच न्यायालयात कबुली

मुंबईतील ९६५ धार्मिक स्थळांवर बेकायदा भोंगे असून त्यातील एकावरही कारवाई करण्यात आली नसल्याची कबुली

मुंबई उच्च न्यायालय

’न्यायालयाने आदेश देऊनही कारवाई कुणावरच नाही
मुंबईतील ९६५ धार्मिक स्थळांवर बेकायदा भोंगे असून त्यातील एकावरही कारवाई करण्यात आली नसल्याची कबुली खुद्द मुंबई पोलिसांनीच प्रतिज्ञापत्राद्वारे उच्च न्यायालयाला दिली आहे. तर नवी मुंबई पोलिसांनी नेमक्या किती धार्मिक स्थळांवर बेकायदा भोंगे आहेत याची माहिती देण्याऐवजी केवळ कारवाईची आकडेवारी प्रतिज्ञापत्राद्वारे सादर केली असून त्याचा आकडा अवघा १३ एवढाच आहे.

पोलिसांच्या परवानगीशिवाय लावण्यात आलेल्या बेकायदा भोंग्यांप्रकरणी नवी मुंबईतील रहिवासी संतोष पाचलाग यांनी केलेल्या जनहित याचिकेची दखल घेत न्यायालयाने मुंबई आणि नवी मुंबईतील मशिदींवर पोलिसांच्या परवानगीशिवाय लावण्यात आलेल्या बेकायदा भोंग्यांवर कारवाई करण्याचे आणि कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश गेल्या वर्षी दोन्ही शहरांच्या पोलीसप्रमुखांना दिले होते. मात्र वर्ष उलटूनही दोन्ही पोलीसप्रमुखांनी त्याबाबतचा अहवाल सादर केलेला नाही, ही बाब याचिकाकर्त्यांच्या वतीने मागील सुनावणीच्या वेळी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. न्यायमूर्ती विद्यासागर कानडे आणि न्यायमूर्ती शालिनी जोशी-फणसाळकर यांच्या खंडपीठाने संताप व्यक्त केला. तसेच वर्ष उलटूनही कारवाईचा अहवाल सादर करण्यात आलेला नाही. हे लक्षात घेता कारवाईसाठी आणि त्याचा अहवाल सादर करण्यासाठी दोन्ही प्रतिवाद्यांना पुरेसा वेळ मिळालेला आहे. त्यामुळे नेमकी काय कारवाई केली याचा दोन आठवडय़ांत अहवाल सादर करा अन्यथा बाजू न ऐकताच आदेश द्यावे लागतील, असा इशारा न्यायालयाने दोन्ही शहरांच्या पोलीसप्रमुखांना दिला आहे. तसेच अहवाल सादर करण्याची ही शेवटची संधी असल्याचेही न्यायालयाने बजावले होते.

त्या पाश्र्वभूमीवर मुंबई आणि नवी मुंबई पोलिसांनी प्रतिज्ञापत्र सादर केले असून, मुंबई पोलिसांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात एकूण किती धार्मिक स्थळे आहेत, त्यावरील किती धार्मिक स्थळांवर भोंगे आहेत, त्यातील कितींनी परवानगी घेतलेली आहे आणि किती परवानगीविना आहेत, शिवाय कितींवर कारवाई करण्यात आली याची माहिती दिली आहे. त्यानुसार मुंबईत एकूण ९६५ धार्मिक स्थळांवर बेकायदा भोंगे वा ध्वनिक्षेपक असल्याचे नमूद करण्यात आले. अशा धार्मिक स्थळांच्या प्रशासनाला संबंधित यंत्रणेकडून परवानगी घेण्याचे बजावण्यात आले असून त्यानंतरही त्यांनी परवाना घेतला नाही, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा दावा प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे. मात्र अद्यापपर्यंत एकावरही कारवाई करण्यात आलेली नाही, अशी कबुलीही प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे.
तर याप्रकरणी कारवाईचा बडगा उगारला जात असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांनी प्रतिज्ञापत्राद्वारे दिली आहे. आतापर्यंत १३ प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली असून ज्या धार्मिक स्थळांवर बेकायदा भोंगे आहेत, त्यांनी परवानगीसाठी अर्ज केलेला आहे आणि त्यांच्या अर्जावर निर्णय घेतले जात असल्याचेही स्पष्ट केले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 965 religious places having unauthorized sound systems in mumbai