scorecardresearch

मालाडमधील १०० वर्षे जुनी इमारत काळाच्या पडद्याआड..

मालाड परिसरातील घडामोडींची साक्षीदार असलेली ही इमारत लवकरच काळाच्या पडद्याआड जाणार आहे.

मालाडमधील १०० वर्षे जुनी इमारत काळाच्या पडद्याआड..
100 वर्ष जुन्या इमारतीच्या पाडकामाला आज सुरूवात झाली आहे

प्रसाद रावकर

मुंबई : उत्तर मुंबई परिसरातील धोकादायक बनलेली तब्बल १०० वर्षे जुनी दुमजली इमारत रहिवासी, पादचारी आणि वाहतुकीची सुरक्षितता लक्षात घेऊन जमीनदोस्त करण्याची तयारी मुंबई महानगरपालिकेने सुरू केली आहे. या इमारतीमधील १७ रहिवासी आणि १४ व्यावसायिक गाळेधारकांना लवकरच इमारत रिकामी करावी लागणार आहे. मालाड परिसरातील घडामोडींची साक्षीदार असलेली ही इमारतीच्या पाडकामाला सुरुवात झाली आहे.

पश्चिम उपनगरांमधून जाणाऱ्या एस. व्ही. रोडवर कायम वाहनांची वर्दळ असते. तसेच अनेक रेल्वे स्थानकांपासून अगदी हाकेच्या अंतरावरून जाणारा एस. व्ही. रोड कायमच पादचाऱ्यांच्या गर्दीत हरवून जातो. त्याशिवाय पदपथावर पथाऱ्या पसरणाऱ्या फेरीवाल्यांचा कलकलाट कायमच कानावर पडत असतो. एस. व्ही. रोडवर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीमुळे निरनिराळे प्रश्न निर्माण होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन एस. व्ही. रोडचे रुंदीकरण करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. मात्र मालाडमधील दुमजली शांती दर्शन इमारत एस. व्ही. रोडच्या रुंदीकरणात अडथळा बनली आहे. ही इमारत जुगल किशोर या नावानेही ओळखली जाते.

हेही वाचा >>> Maharashtra Breaking News Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांनी ११.३० वाजता पत्रकार परिषद

मालाड (पश्चिम) परिसरातील शंकर मंदिरासमोर एस. व्ही. रोड आणि जकारिया रोडच्या वळणावर १९२३ च्या सुमारास ही दुमजली इमारत बांधण्यात आली होती. या इमारतीत १७ रहिवासी वास्तव्यास आहेत. तर १४ व्यावसायिक गाळे आहेत. ही सुमारे १०० वर्षे जुनी इमारत अतिधोकादायक असल्याचे तांत्रिक सल्लागार समितीने (टेक्निकल अॅडव्हायझली कमिटी) जाहीर केले आणि या इमारतीचा सी-१ श्रेणीमध्ये समावेश करण्यात आला. लगतच्या रस्त्यावर प्रचंड वर्दळ असल्यामुळे भविष्यात अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही इमारत जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या इमारतीचे प्रकरण न्यायप्रवीष्ट होते.

हेही वाचा >>> मुंबई : टेम्पो आणि दुचाकीच्या अपघातात महिलेसह दोघांचा मृत्यू

ही धोकादायक इमारत तीन आठवड्यांमध्ये रिकामी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. तीन आठवड्यात इमारत रिकामी करण्यात आली नाही, तर मुंबई महानगरपालिकेने योग्य ती कारवाई करण्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते. न्यायालयाचा आदेश लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने ही इमारत रिकामी करण्यासाठी नोटीस बजावली होती. लवकरच ही इमारत रिकामी करून पाडकाम करण्यात येईल, असे महानगरपालिकेच्या पी-उत्तर विभाग कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-01-2023 at 11:27 IST

संबंधित बातम्या