मुंबईः पत्नीसोबत फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलेल्या ३७ वर्षीय व्यक्तीला मोटरगाडीने धडक दिली असून रस्ता ओलांडताना हा अपघात घडला. अपघातानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी अज्ञात मोटरगाडी चालकाविरोधात पायधुनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी चालकाने अपघातानंतर घटनास्थळावरून पळ काढला असून सीसीटीव्ही चित्रिकरणाच्या मदतीने त्याचा शोध सुरू आहे.

फकरुद्दीन रमजान सय्यद (३७)असे मृत व्यक्तीचे नाव असून बुधवारी पहाटे पायधुनीतील पी. डिमेलो रोड, कुर्ला स्ट्रिट परिसरात हा अपघात घडला. जाकीरा फकरुद्दीन सय्यद (२५) असे फकरुद्दीच्या पत्नीचे नाव असून तिच्या तक्रारीवरून पायधुनी पोलिसांनी आरोपी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

जाकिरा या पती फरुद्दीन व पाच वर्षांचा मुलगा नवाज यांच्यासह चेंबूर परिसरात राहतात. मुलाचे आधारकार्ड करायचे असल्यामुळे ते पायधुनी येथे राहणाऱ्या सासू-सासऱ्यांच्या घरी आले होते. फकरुद्दीन पायधुनी परिसरात खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय करत असत. फकरूद्दीन त्याची पत्नी जाकीरा, मुलगा नवाज व जाकिराच्या बहिणीची मुलगी अल्फीया हे सर्व सध्या पायधुनीतच राहात होते. खाद्य पदार्थ विक्रीच्या व्यवसायावरून रात्री उशीरा पती फकरुद्दीन आल्यानंतर दोघेही बराचवेळ गप्पा मारत बसले होते पहाटे त्यांनी परिसरात फेरफटका मारण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला.

पी. डिमेलो रोड, कुर्ला स्ट्रिट येथे फेरफटका मारत असताना फकरूद्दीन रस्ता ओलांडत होते. त्यावेळी भरधाव वेगाने आलेल्या मोटरगाडीने त्यांना धडक दिली. धडकेनंतर फकरूद्दीन घटनास्थळापासून काही अंतरावर फेकले गेले. पण मोटरगाडी चालकाने मोटरगाडी तेथे न थांबवता पळ काढला. आरोपी चालकाने फकरूद्दीनला कोणतीही वैद्यकीय मदत केली नाही. तसेच घटनेबाबत पोलीस अथवा इतर कोणत्याही यंत्रणेला कळवले नाही. जाकिरा पतीजवळ गेली असता ते बेशुद्धावस्थेत खाली पडले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जाकीराने तेथून जाणारी टॅक्सी थांबवली व टॅक्सी चालकाकडे मदत मागितली. फकरुद्दीनेला टॅक्सीतून तातडीने जे.जे. रुग्णालयात नेण्यात आले. तेथे अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले. पण उपचाराला फकरूद्दीन यांचा प्रतिसाद मिळाला नाही. अखेर पहाटे सहा वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पायधुनी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी जाकीरा सय्यद हिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी कारचालकाविरुद्ध हलगर्जीपणाने मोटरगाडी चालवून तिच्या पतीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. परिसरातील सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपी मोटरगाडी चालकाचा शोध सुरू आहे.