एका पादचाऱ्याच्या हत्येचा आरोप असलेल्या दुचाकीस्वाराची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या ३० वर्षीय दुचाकीस्वाराला रॅश ड्रायव्हिंगच्या आरोपातून निर्दोष मुक्त केलं आहे. याचं कारण असं कि, या दुचाकीस्वाराने ज्या महिलेला धडक दिली होती त्या महिलेने झेब्रा क्रॉसिंगवरून रस्ता ओलांडला नव्हता असं तपासात आढळून आलं. “झेब्रा क्रॉसिंग असल्याशिवाय पादचाऱ्यांनी महामार्ग ओलांडू नये,” असं देखील न्यायालयाने यावेळी नमूद केलं आहे.

मुद्रुका कांबळे ही ६० वर्षीय वृद्ध महिला १० ऑगस्ट २०१७ रोजी कामराज नगरातील चेंबूर सेंट्रल गेटजवळ ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे ओलांडण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, यावेळी एका वाहनाने तिला धडक दिली आणि तो पळून गेला. या वृद्ध महिलेला त्यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु तिचा मृत्यू झाला.

पुरावा उपलब्ध नाही

पंतनगर पोलीस ठाण्यात पुढे या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतच्या तपासादरम्यान असं आढळून आलं की, एका होंडा अॅक्टिव्हा मोटारसायकलने मुद्रुका कांबळे यांना धडक दिली होती. त्यानंतर, पोलिसांनी आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं आणि खटला सुरू झाला. यावेळी, फिर्यादीने सादर केलेले साक्षीदार हे त्या घटनेनंतर जमलेले लोक होते. यावेळी, न्यायालयाने असं निरीक्षण नोंदवलं की, “या घटनेशी संबंधित कोणताही पुरावा उपलब्ध नाही.”

निर्दोष मुक्तता

न्यायालयाने पुढे असं नमूद केलं आहे कि, “घटनास्थळापासून फूटपाथ सुमारे ३५ फूट अंतरावर आणि डिव्हायडर १५ फूट अंतरावर होता. याचा अर्थ मृत मुद्रुका कांबळे या रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना ही घटना रस्त्याच्या मधोमध घडली.” दंडाधिकारी एस एस परावे म्हणाले कि, “हा सामान्य ज्ञानाचा प्रश्न आहे की, झेब्रा क्रॉसिंग असल्याशिवाय पादचाऱ्यांनी पूर्व द्रुतगती महामार्ग ओलांडू नये. रेकॉर्डमध्ये असं काहीही नाही ज्यावरून स्पष्ट होईल की घटनास्थळी झेब्रा क्रॉसिंग होतं. त्यामुळे, आरोपीला कथित गुन्ह्याशी जोडलं जाऊ शकत नाही.”