मुंबई : वडाळा येथील शाळेजवळ तीन शालेय विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात रफी अहमद किडवाई (आरएके) मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विनयभंग व बालकांचे लेैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याअंतर्गत (पोक्सो) आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसी टीव्हीच्या मदतीने त्याचा शोध सुरू आहे.
पीडित मुली १४ ते १५ वर्ष वयोगटातील आहेत. त्या शुक्रवारी शाळेत येत असताना तेथील बस थांब्याजवळ एका अज्ञात व्यक्तीने एका मुलीचा विनयभंग केला. तसेच इतर दोन मुलींनाही इशारा केला. मुलींनी शाळेत आल्यावर हा प्रकार शिक्षिकेला सांगितला. त्यानंतर शाळेच्या वतीने याप्रकरणी तक्रार देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आरएके मार्ग पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.