मुंबई : पालिकेचे रुग्णालय सुरू करावे या मागणीसाठी विक्रोळीतील नागरिकांनी एकत्र येऊन साखळी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. विक्रोळीतील पालिकेचे क्रांतिवीर महात्मा जोतिबा फुले रुग्णालय तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रसूती रुग्णालय अशी दोन्ही रुग्णालये बिकट अवस्थेत असून त्यामुळे विक्रोळीवासीयांची उपचारासाठी परवड होत आहे. रुग्णालये लवकर सुरू करावी या मागणीसाठी विक्रोळीवासीयांनी रुग्णालयाबाहेर सोमवारपासून साखळी उपोषणाचा इशारा दिला आहे.

विक्रोळीमध्ये क्रांतिवीर महात्मा जोतिबा फुले हे पालिकेचे रुग्णालय असून त्याची इमारत मोडकळीस आली आहे. त्यामुळे इमारतीत फक्त बाह्य रुग्ण विभाग सुरू आहे. गेल्या पाच वर्षापासून हे रुग्णालय नावापुरते सुरू आहे. अनेकदा पत्रव्यवहार करूनही प्रशासनाकडून काहीही उत्तर रहिवाशांना मिळालेले नाही. विक्रोळीतील नागरिकांनी एकत्र येऊन कोणत्याही राजकीय पक्षाचा आधार न घेता आंदोलन करण्याचे ठरवले असल्याची माहिती आम्ही विक्रोळीकर संघटनेचे गणेश रोकडे यांनी दिली.

सध्या या रुग्णालयाबाहेर एका तात्पुरत्या जागेत, कंटेनरमध्ये दवाखाना चालवला जात असून तेथे प्रचंड गर्दी जमते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे हाल होतात व रोगप्रसारचाही धोका असतो. किरकोळ उपचारांसाठी राजावाडी, शीव रुग्णालय किंवा केईएमला जावे लागते, असेही रोकडे यांनी सांगितले. तसेच टागोर नगर येथे असलेले प्रसूतिगृह देखील बंद असल्यामुळे घाटकोपर, पवई, विक्रोळी, कांजूरमार्ग येथील गरीब नागरिकांना शहर भागात किंवा खाजगी रुग्णालयात जावे लागते. त्यामुळे या रुग्णालयाबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन सर्वसामान्यांसाठी सुरू करावीत अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. चांगल्या आरोग्यसेवेच्या मागणीसाठी नागरिकांनी सोमवारी १२ सप्टेंबरपासून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत साखळी उपोषण करण्याचा इशारा पालिका प्रशासनाला दिला आहे.