scorecardresearch

मुंबईः अभिनेते पुनित इसर यांच्या तक्रारीवरुन कंपनीच्या अधिकाऱ्याला अटक

ईमेल आयडी हॅक करुन नाटकाचे प्रयोग रद्द झाल्याचा संदेश पाठवून फसणुक

मुंबईः अभिनेते पुनित इसर यांच्या तक्रारीवरुन कंपनीच्या अधिकाऱ्याला अटक
( प्रतिनिधिक छायाचित्र )

महाभारत या मालिकाद्वारे दुर्योधनच्या भूमिकेमुळे प्रकाशझोतात आलेले अभिनेते पुनित सुदेश इसर यांच्या कंपनीचा ईमेल आयडी हॅक करुन नाटकाचे प्रयोग रद्द झाल्याचा बनावट संदेश पाठवून १४ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी फसवणूकीसह माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अभिषेक सुशीलकुमार नारायण या कंपनीच्या अधिकाऱ्याला ओशिवरा पोलिसांनी अटक केली. अभिषेकने कंपनीचा ईमेल आयडी हॅक करुन फसवणुकीचा हा प्रयत्न केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी एक मोबाईलसह दोन सिमकार्ड जप्त करण्यात आली आहेत.

हेही वाचा >>>राज ठाकरेंचा राहुल गांधींवर हल्लाबोल, म्हणाले “अरे गधड्या तुझी लायकी…”

पुनित सुदेश इसर हे अभिनेते, निर्माता-दिग्दर्शक म्हणून परिचित आहेत. त्यांची शो मॅन थिएटर नावाची एक कंपनी असून या कंपनीत अभिषेक आणि राहुल चौरसिया कामाला होते. त्यांच्यावर कार्यालयातील सर्व आर्थिक व्यवहारासह इतर कामाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यांच्या कंपनीने जय श्री राम नावाच्या एका नाटकाच्या एलईडीचे काम सुरु केले होते. त्यांना एनसीपीए सभागृहाची नाटकाच्या प्रयोगासाठी नोंदणी करायची होती. अभिषेक आणि राहूलवर त्यांनी ती जबाबदारी सोपविली होती. त्यावेळी सभागृहाच्या नोंदणीसाठी त्यांनी १३ लाख ७६ हजार ४०० रुपयांचा एक धनादेश दिला होता. धनादेश वठल्यानंतर सभागृह मालकाने १४ आणि १५ जानेवारी २०२३ च्या प्रयोगाची नोंदणी केली. त्याबाबत ईमेल आयडीवर कळवण्यात आले. पण सभागृह नोंदणीची प्रत अभिषेकने पुनित इसर यांना दिली नाही. त्यानंतर अभिषेकने आपण नोकरी सोडत असल्याचे पुनीत यांना कळवले. त्यानंतर पुनीत इसर यांनी कंपनीचा ईमेल उघडण्याचा प्रयत्न केला असता तो उघडला नाही. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने कंपनीचा मेल आयडी हॅक केल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. त्यानंतर पुनीत इसर यांनी त्यांच्या मुलीच्या ईमेलवरुन एनसीपीएला ईमेल पाठवून नोंदणीची प्रत मिळाली नसल्याचे सांगितले. त्यावेळी सभागृहाने तुमचे प्रयोग रद्द झाले असून रक्कम परत करण्यात आल्याचे सांगितले.

हेही वाचा >>>“राज्यपाल पदावर बसलात म्हणून मान राखतोय नाहीतर…”, राज ठाकरेंकडून कोश्यारींचा समाचार

तपासणी केली असता ज्या बँक खात्यात पैसे परत पाठवण्यात आले होते. ते बँग खाते अभिषेकचे असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पुनित इसर यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन कंपनीचे कर्मचारी अभिषेक नारायण आणि राहुल चौरसिया यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी मालाडच्या मालवणी, मढ, पास्कलवाडीतील राहत्या घरातून अभिषेकला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची चौकशी सुरु आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 20:39 IST

संबंधित बातम्या