भाजपा आमदारांच्या शिष्टमंडळाने आज मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याकडे तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत. या भेटीनंतर भाजपा नेत्यांशी माध्यमांनी संवाद साधला. यावेळी विधानपरिषध विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपा आमदार अतुल भातखळकर, मोहीत कंबोज, मंगलप्रभात लोढा आदी उपस्थित होते.

या भेटीसंदर्भात माहिती देतना भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी माध्यमांना सांगितले की, “आता भाजपाच्या आमदारांचं शिष्टमंडळ आमचे मुंबईचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा व प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वात आम्ही आता मुंबई शहर पोलीस आयुक्तांना भेटलो. त्यांना निवेदन देऊन तीन प्रमुख मागण्या केलेल्या आहेत. पोलखोल अभियान सुरू झाल्याच्या पहिल्यादिवसापासून ठिकठिकाणी शिवसैनिकांकडून हल्ले होत आहेत, अडथळे आणण्याचा प्रयत्न केला जातोय आणि संबंधित पोलीस स्टेशन या संदर्भातील त्यांच्याविरोधातील कारवाई करत नाही, हे आम्ही आज त्यांच्या निदर्शनास आणून दिलं.”

तसेच, “मोहीत कंबोज यांच्या गाडावर काल हल्ला झाला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झालेली आहे, अनेक शिवसैनिक त्यांच्या गाडीच्या मागे लागले त्यामुळे या संदर्भात ३०७ चा हत्येचा प्रयत्न हा गुन्हा दाखल करून, या सगळ्यांची चौकशी करावी अशी दुसरी मागणी आम्ही केली.” असल्याचं भातखळकर म्हणाले.

याचबरोबर “ शिवसैनिक पोलखोलच्या बाबतीत आणि कालच्या हल्ल्याच्याबाबत जो हिंसाचार करत आहेत, त्याचं समर्थन शिवसेनेचे सर्व महत्वाचे नेते हे जाहीरपणे करत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या या नेत्यांची या हिंसाचाराला फूस आहे, हा हिंसाचार करण्यामागे त्यांचच सांगणं आहे का? याची देखील चौकशी केली पाहिजे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा तपास हा मुंबई पोलिसांनी गुन्हे शाखेकडे द्यावा आणि कालबध्द मर्यादेत या सर्व गोष्टींचा तपास करावा. अशा तीन प्रमुख मागण्या आज आम्ही निवेदनाद्वारे मुंबई शहर पोलीस आयुक्तांकडे केल्या आहेत.” अशी माहिती आमदार अतुल भातखळखर यांनी माध्यमांना दिली.

ते २४ तासांत काही निर्णय घेतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. नाही घेतला तर… –

तर, “ पोलीस आयुक्तांनी निवेदन वाचून आम्ही त्या संदर्भातील योग्य ती कारवाई करू असं आम्हाला सांगितलं आहे. आम्ही ३०७ कलम लावा अशी मागणी केलेली आहे. या संदर्भातील ते २४ तासांत काही निर्णय घेतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे. नाही घेतला तर कायदेशीरदृष्ट्या जे पुढचं पाऊल असेल, ते आम्ही उचलू. ” असा इशाराही आमदार अतुल भातखळकर यांनी यावेळी दिला.