मुंबई : कोलकाता घटनेच्या निषेधार्थ मुंबईतील रुग्णालयांमध्ये गेल्या सात दिवसांपासून निवासी डॉक्टरांचा संप सुरू आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या केईएम, नायर, शीव व कूपर रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागातील दररोज पाच ते सहा हजार असलेली रुग्णसंख्या हजाराच्या घरात आली आहे.
केंद्रीय आरोग्य संरक्षण कायदा करण्याबाबत केंद्र सरकारकडून लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही, असा पवित्रा घेऊन निवासी डॉक्टरांनी १३ ऑगस्टपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात १६ ऑगस्ट रोजी बंधपत्रित डॉक्टर व आंतरवासिता विद्यार्थीही सहभागी झाले. त्यानंतर, १७ ऑगस्टपासून महाविद्यालयातील अध्यापक वर्गानेदेखील आंदोलनाला पाठिंबा दर्शवून बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांच्या आंदोलनाचा परिणाम रुग्णसेवेवर होऊ नये यासाठी मुंबई महानगरपालिकेने तातडीने उपाययोजना करून महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील २०० वैद्याकीय अधिकाऱ्यांची कुमक दिली. त्यामुळे, बाह्यरुग्ण विभाग सुरू ठेवणे शक्य झाले असले तरी मागील सात दिवसांमध्ये बाह्यरुग्ण विभागातील रुग्ण संख्येत सातत्याने घट होत आहे.
हेही वाचा >>>दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोघांना अटक, तिघे पळाले
केईएम आणि शीव रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात दररोज सहा हजार रुग्ण उपचारासाठी येतात, तर नायर रुग्णालयातील रुग्णसंख्या पाच हजार आणि कूपर रुग्णालयात दोन हजार रुग्ण दररोज उपचारासाठी येतात. मात्र, या चारही रुग्णालयांमध्ये आंदोलनाच्या पहिल्या दिवशी रुग्णसंख्येत निम्म्याने घट झाली. त्यानंतर, सातत्याने रुग्णसंख्येत घट होत असून, रुग्णसंख्या सोमवारी हजार ते दीड हजारापर्यंत खाली आली. चारही रुग्णालयांमध्ये शुकशुकाट दिसत होता. काही विभागांसमोर रुग्णांची तुरळक संख्या होती, तर काही विभागांमध्ये एखाद दुसरा रुग्ण दिसून येत होता. क्ष-किरण व सोनोग्राफी काढण्यासाठीही तुरळक रुग्णच दिसत होते. रक्षाबंधनामुळे कमी रुग्णांची नोंद झाल्याची शक्यता रुग्णालय प्रशासनाकडून वर्तवण्यात येत आहे. असे असले तरी आंदोलनामुळे रुग्णांनी महापालिकेच्या रुग्णालयाकडे पाठ फिरवल्याचे रुग्णसंख्येवरून स्पष्ट होत आहे.
हेही वाचा >>>विकासकांना बांधकामाचे गुणवत्ता हमी प्रमाणपत्र बंधनकारक, महारेराच्या संकेतस्थळावर प्रमाणपत्र प्रसिद्ध करावे लागणार
कोलकाता येथील महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टर बलात्कार आणि हत्याप्रकरणाच्या निषेधार्थ देशभरात निदर्शने होत आहेत. सायन रुग्णालयातील डॉक्टर, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी सोमवारी या घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढला.
सात दिवसांतील रुग्णंसख्या
दिवस – केईएम – शीव – नायर – कूपर
१३ ऑगस्ट – २९८६ – ३४२६ – २३६८ – ९१३
१४ ऑगस्ट – ३१२० – २२१२ – १८८५ – १६३८
१५ ऑगस्ट – (सार्वजनिक सुट्टी)
१६ ऑगस्ट – ३१८३ – २५७९ – १३०७ – ९५४
१७ ऑगस्ट – २२७८ – ८६६ – ७२४ – १२४४
१८ ऑगस्ट – (सार्वजनिक सुट्टी)
१९ ऑगस्ट – १६१८ – १०१५ – ६७८ – १३२७