वसई: वसईतील ‘वसई वन’ या १२ मजली निवासी इमारतीला शुक्रवारी दुपारी आग लागली. या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी ८ व्या मजल्यांवरील घरांचे नुकसान झाले. आगीच्या वेळी ९ व्या मजल्यावर अडकलेल्या वृद्ध महिलेची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली.

वसई पश्चिमेच्या अंबाडी रोड येथे ‘वसई वन’ नावाचा दोन इमारती आहेत. यातील एक इमारत  ७ मजली तर दुसरी इमारत १२ मजली आहे. शुक्रवारी दुपारी १२ मजली इमारतीच्या पॅसेज मध्ये अचानक आगली. काही क्षणातच आग दोन घरात पसरली. आग लागताच मजल्यावरील सर्व रहिवाशी खाली आले. मात्र ९ व्या मजल्यावरील घरात एक वृद्ध महिला  अडकली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी या महिलेला सुखरूप खाली आणले. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळेतच आगीवर नियंत्रण मिळवून आग आटोक्यात आणली यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र ८ व्या मजल्यावरील घरांचे मोठे नुकसान झाले.

खरदारीचा उपाय म्हणून इमारतीचा विद्युत पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. इमारतीच्या विद्युत तारांमध्ये काही दोष होता का ते तपासले जाणार असल्याची माहिती वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख दिलीप पालव यांनी सांगितले.