Mumbai Local Fire : मुंबई लोकल म्हणजे मुंबईकरांची लाईफलाईनच. लाखो मुंबईकर या लोकल ट्रेनचा वापर करुन मुंबई आणि संध्याकाळी आपलं घर गाठत असतात. तरीही अपघात, पाऊस या सगळ्या घटना घडत असतातच. मुंबईत आज बर्निंग ट्रेनचा थरार पाहण्यास मिळाला.
नेमकी काय घटना घडली?
मुंबईतील कुर्ला आणि विद्याविहार स्टेशनच्या दरम्यान ट्रॅकवर उभ्या असलेल्या एका लोकलला आग लागली. ही घटना समोर येताच एकच खळबळ उडाली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव काही काळासाठी लोकल वाहतूक थांबवण्यात आली. तसंच अर्ध्या तासाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. लोकल ट्रेन रिकामी होती त्यामुळे कुठलीही जिवीतहानी झालेली नाही. या घटनेचा व्हिडीओ मात्र व्हायरल झाला आहे. IANS ने हे वृत्त दिलं आहे.
हळूहळू वाहतूक पूर्वपदावर
लोकल सेवा सुरळीत आणि वेळेवर चालवण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्नशील असते, विशेष म्हणजे अपघात रोखण्यासाठीही प्रशासनाने प्रयत्न असतात, मात्र तरीही ही घटना घडली आहे. या आगीच्या घटनेमुळे मध्य रेल्वेच्या स्लो मार्गावरील वाहतूक ठप्प होती, कुर्ला स्टेशनच्या पुढे काही वेळेसाठी बंद करण्यात आली होती. रेल्वे प्रशासनाने तातडीने लोकल ट्रेनला लागलेली आग आटोकण्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. तब्बल अर्ध्या तासाने आग विझवण्यात आली आहे, त्यामुळे या मार्गावरील लोकल वाहतूक पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून सुरू होते.
रात्री ८.३० च्या दरम्यान घडली घटना
रात्री साडे आठच्या सुमारास कुर्ला रेल्वे स्थानकातील यार्डात उभ्या असलेल्या एका लोकलला आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळे स्थानकात भीतीचं वातावरण पाहण्यास मिळालं. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली. समोर आलेल्या माहितीनुसार ही लोकल साइडिंग लाईनमध्ये उभी होती. लोकलला आग लागल्याने धुराचे लोट आणि आगीचे लोळ आकाशात गेले. त्यामुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण होतं. या प्रकरणात सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
रिकाम्या लोकलला आग लागल्याने ओव्हरहेड वायर बंद कराव्या लागल्या. मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार आग नियंत्रणात आणण्यासाठी विद्याविहार आणि सायन रेल्वे स्थानकांदरम्यान रात्री २०.३८ ते २०.५५ या वेळेत ओएचई बंद करण्यात आली होती.रात्री ८.५५ वाजता आग नियंत्रणात आणण्यात यश आले आणि त्यानंतर लगेचच रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी ओएचई पूर्ववत करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
