मुंबई परिसरातील सराफांची दुकाने लुटणाऱ्या राजस्थानी टोळीतील चौघांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या दहिसर येथील पथकाने अटक केली आहे. या टोळीने गेल्या दोन वर्षांत विविध सराफांच्या दुकानातून लाखो रुपयांचा ऐवज लुटला आहे.
बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ हे चारही आरोपी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक मिलिंद खेतले यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून जोरसिंग खरवड (२९), सोहनसिंग दसाणा (२५) , गंगासिंग कडेसा (२३) आणि हिरासिंग दसाणा (२५) या चौघांना अटक केली. या टोळीने कांदिवली येथील मालवंडकर ज्वेलर्सची भिंत तोडून ४५ लाख रुपये, चारकोप येथील अरिहंत ज्वेलर्सची भिंत तोडून १३ लाख रुपये तसेच कल्याण येथील कल्याण ज्वेलर्सचे कुलुप फोडून एक लाख रुपयांचा ऐवज चोरला होता. हे सर्व आरोपी मुंबईच्या विविध ठिकाणातील सराफांच्या दुकानांची पाहणी करून त्यातील ऐवज लुटून राजस्थानला पळून जात होते, अशी माहिती निरीक्षक खेतले यांनी
दिली.