‘वारी’ या शब्दाचा अर्थ यात्रा, नियमित फेरी, व्रत, येरझार असा सांगितला जातो. वारकऱ्याला पंढरपूरी आपल्या विठू माऊलीला भेटायची आस लागलेली असते. त्यासाठी तो दरवर्षी ‘वारी’ करतो, जेष्ठ वदय अष्टमीला आळंदीहून विधीवत पालखीचे प्रस्थान होते. आषाढ शुद्ध एकादशीला पंढरपूरात तिचे आगमन होते. आषाढ पौर्णिमेपर्यंत पंढरपूरात माऊलीचा उत्सव चालतो. वारकरी संप्रदायात पंढरीच्या ‘वारी’ला फार महत्त्व आहे. वारकर्‍याने वर्षातून एकदा तरी पंढरपूरच्या विठूरायाचे दर्शन घ्यावे, असा प्रघात आहे. गळ्यांत तुळशीमाळा, कानाच्या दोन्ही पाळ्यांना गोपीचंदन, कपाळी बुक्का, खांद्यावर पताका आणि हातात टाळ मृदुंग अशा थाटात वारकरी शिस्तबद्धपणे ‘वारी’त मार्गक्रमण करताना दिसतात. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचे अविभाज्य अंग असलेल्या पंढरपूरच्या ‘वारी’चा हा सोहळा अभूतपूर्व असतो. ही ‘वारी’ पाहण्यासाठी तसेच अनुभवण्यासाठी देश-विदेशातून लोक येतात. आजच्या माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या शहरी तरुणांनादेखील या वारीने भुरळ घातली असून, काही तरुण गेली काही वर्षे ‘आयटी दिंडी’द्वारे या ‘वारी’त सामिल होत आहेत. वर्षागणिक या ‘आयटी दिंडी’ उपक्रमात तरुणांचा सहभाग वाढत असून, तो आणखी वाढावा यासाठी ते कायम प्रयत्नशील असतात. यासाठी त्यांनी http://www.waari.org नावाचे संकेतस्थळदेखील सुरू केले आहे. दर वर्षी ही मंडळी आळंदी ते पुणे ‘वारी’सोबत चालत जातात. काही जण पंढरपूरपर्यंत जातात. परदेशात अलीकडच्या काळात चालण्याचे उपक्रम सुरू झाले असून, त्यात भाग घेण्यासाठी तेथील लोकांना खूप खर्च करावा लागतो. तर आपल्याकडील ‘वारी’ला हजारो वर्षांपासून सांस्कृतिक आणि धार्मिक ठेवा आहे. त्यातील समरसता, अध्यात्म हे अनुभवण्याचे विषय आहेत. ही तरुण मंडळी नुसतीच ‘वारी’सोबत चालत नाही, तर इतर वारकऱयांची सेवादेखील करतात. यावर्षी ही वारी २१ जून (शनिवार) रोजी आळंदीतून निघून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पुण्यात येणार आहे. यात सहभागी होऊ इच्छिणारे http://www.waari.org या संकेतस्थळावर देण्यात आलेला फॉर्म भरून वारीतील आपला सहभाग नोंदवू शकतात. या शिवाय ‘आयटी दिंडी’ Waari Dindee नावाचा फेसबूकवर ग्रुप असून, संपर्क साधण्यासाठी ITDindee@gmail.com हा त्यांचा इमेल पत्ता आहे.