माटुंगा रेल्वे स्थानकावर महिलांची छेडछाड काढत विनयभंग करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र महिलांनी कोणतीही तक्रार दाखल न केल्याने फक्त चोरीचा गुन्हा दाखल होत या विकृताची सुटका होण्याची शक्यता आहे. हा व्यक्ती रेल्वे स्थानकावर महिलांना स्पर्श करताना सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत आहे. इतकंच नाही तर तो हस्तमैथून देखील करत होता. दोन महिलांना पोलिसांना यासंबंधी माहिती दिली. पण त्यांनी तक्रार दाखल करण्यास नकार दिला. रजिऊर खान असं या विकृताचं नाव आहे.

पोलिसांनी यानंतर सापळा रचत खानला चोरीच्या आरोपाखाली अटक केली. मात्र त्याच्याविरोधात एकाही महिलेने तक्रार दाखल केली नसल्याने पोलीस लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करु शकले नाहीत. पोलिसांनी पीडित महिलांना पुढे येऊन एफआयआर दाखल करण्याचं आवाहन केलं आहे.

“अनेकदा लोकांच्या भीतीने महिला पुढे येऊन एफआयआर दाखल करत नाहीत. पण जर कोणी तक्रार दाखल केली तर आम्ही पूर्ण तपास करुन आरोपीविरोधात कडक कारवाई करु. महिलांनी कायद्याला घाबरण्याची गरज नाही. त्यांची ओळख उघड केली जाणार नाही. पण एफआयआर दाखल झाला तरच त्याच्याविरोधात भक्कम केस उभी राहू शकते. यानंतर तो पुन्हा कधी महिलांना त्रास देणार नाही,” असं एका रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

सीसीटीव्हीत नेमकं काय ?
२५ जानेवारी रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास तो एका महिलेचा पाठलाग करताना दिसत आहे. यानंतर तो आजुबाजूला कोणी नाही याची खात्री करुन घेतो आणि महिलेकडे पाहून हस्तमैथून करण्यास सुरुवात करतो. यानंतर २६ जानेवारीला खान पुन्हा एकदा त्याच महिलेचा पाठलाग करताना दिसत आहे. यावेळी तो जबरदस्ती तिचा किस घेतो आणि पळ काढतो.

यानंतर माटुंगा ब्रिजवर दोन महिला आपापसात बोलताना दिसत आहेत. यावेळी खान त्यांच्यातील एका महिलेला स्पर्श करतो. त्यांची प्रतिक्रिया पाहण्यासाटी तो मागे वळून पाहतो. पण महिलांना ही गोष्ट लक्षात आलेली नसल्याने त्या बोलण्यात व्यस्त असतात. यानंतर तो त्यांच्याकडे पाहत राहतो.

चोरीच्या गुन्ह्यात अटक
माटुंगा रेल्वे स्थानकावरील सहा आणि सात क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मला जोडणाऱ्या ब्रीजवर हा प्रकार घडला आहे. सीसीटीव्हीत हे सगळं कैद झालं आहे. हा ब्रीज रात्री सात वाजल्यानंतर निर्मनुष्य असतो त्यामुळे आरोपीने याचा फायदा घेत महिलांचा विनयभंग केला. सीसीटीव्हीत दिसत आहे त्याप्रमाणे त्याने आतापर्यंत दोन महिलांचा विनयभंग केला आहे. महिलांना पोलिसांना अलर्ट केलं असलं तरी तक्रार दाखल केलेली नाही. पोलिसांना सापळा रचत चोरीच्या गुन्ह्यात त्याला अटक केली आहे. त्याची ओळख पटली आहे. पण महिलांनी तक्रार दाखल न केल्याने पोलीस हतबल आहेत. त्यांनी महिलांना पुढे येऊन तक्रार दाखल करण्याचं आवाहन केलं आहे.