नमाज पठण करण्यास नकार दिल्याने नातेवाईंकांकडून चिमुरडीची गळा दाबून हत्या

नमाज पठण करण्यास नकार दिल्याने मुंबईतील अॅन्टॉप हिल परिसरात अल्पवयीन तरुणीची हत्या करण्यात आली आहे

प्रतिकात्मक छायाचित्र

नमाज पठण करण्यास नकार दिल्याने मुंबईतील अॅन्टॉप हिल परिसरात अल्पवयीन तरुणीची हत्या करण्यात आली आहे. तरुणीच्या नातेवाईंकांकडूनच ही हत्या करण्यात आली आहे. गळा दाबून तरुणीची हत्या करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी तीन महिलांना अटक केली असून एका अल्पवयीन तरुणाला ताब्यात घेतलं आहे.

तरुणीच्या कुटुंबियांना तिला प्रत्येक शुक्रवारी नमाज पठण करण्यास सांगितलं होतं. मात्र तरुणीने त्याला स्पष्ट नकार दिला होता. शुक्रवारी जेव्हा पुन्हा एकदा तिने नमाज पठण करण्यास नकार दिला तेव्हा तिच्या काकीने संतापाच्या भरात दुपट्ट्याच्या सहाय्याने तिचा गळा दाबला आणि हत्या केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

हत्या केल्यानंतर गुन्हा लपवण्यासाठी नातेवाईकांनी सायन रुग्णालयातील डॉक्टरांना बाथरुममध्ये घसरुन मृत्यू झाल्याची खोटी माहिती दिली. पण डॉक्टरांनी मृतदेहाची पाहणी केली असता त्यांचा विश्वास बसला नाही. तरुणीच्या गळावर असलेले वण पाहिल्यानंतर डॉक्टरांनी पोलिसांना फोन करुन कळवलं. पोलिसांनी कसून चौकशी केली असता तरुणीच्या काकीने गुन्ह्याची कबूली दिली.

अॅन्टॉप हिल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन पैठणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, “शुक्रवारी जेव्हा तरुणीने नमाज पठण करण्यास नकार दिला तेव्हा नातेवाईक रागावले आणि हत्या केली. तिघांना अटक करण्यात आली असून तिघेही तिचे नातेवाईक आहेत”.

तरुणीचे वडिल गरिब असून एक वेळच्या जेवणाचीही मारामार आहे. त्यातच आईचं निधन झालं असल्याने तरुणी नातेवाईकांसोबत राहत होती. आपल्या मुलीची हत्या झाल्याचं ऐकल्यावर तिच्या वडिलांना धक्का बसला असून, तिला नातेवाईकाच्या ताब्यात दिल्याचा पश्चाताप करत आहेत.

“हत्या करण्याची काय गरज होती ? मी तिचा बाप आहे. जर ती नमाज पठण करत नव्हती तर माझ्याकडे तक्रार करु शकत होते. हे लोक कोणाचंच ऐकत नाहीत”, असं सांगताना तरुणीच्या वडिलांच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: A minor girl killed for not offering namaz