वडाळा येथील एका तयार कपडय़ांच्या कारखान्यात काम करणाऱ्या २५ वर्षीय कामगाराने संशयावरून धारदार शस्त्राने आपल्या दोन मित्रांची हत्या केली. कारखान्यातील कामगारांसमोरच घडलेले हे हत्याकांड कारखान्यात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. पोलिसांनी या ठोस पुराव्यांच्या सहाय्याने ज्ञानसिंग बजरंगसिंग ठाकूर या आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला चार जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
आपल्या आईवरून चेष्टामस्करी करणे आणि आपल्याला मारण्याचा कट रचल्याच्या संशयावरून ज्ञानसिंगने आपले मित्र आणि कारखान्यातील सहकारी शाहबाज अहमद शेख ऊर्फ नाई (१७) व असमद शेख ऊर्फ मॉस (१८) या दोघांची धारदार शस्त्राने हत्या केली. कातरीचे एक पाते लोखंडी पट्टीला बांधून ज्ञानसिंगने दोघांवर वार केले. या हल्ल्यात दोघांचाही मृत्यू झाला.
ज्ञानसिंग, शहबाज, असमद तिघेही उत्तर प्रदेशातील फतेहपूर गावातील असून ज्ञानसिंगनेच या दोघांना मुंबईत आणून तयार कपडय़ांच्या कारखान्यात आपल्यासोबत कामाला लावले होते.
गेल्या काही दिवसांपासून ज्ञानसिंगचे दोघांशीही काही कारणावरून भांडण होत असे. त्यावरून आपल्याला हे दोघे ठार करतील, असा संशय ज्ञानसिंगला वाटत होता. त्यामुळे त्यांनी आपल्याला मारण्यापूर्वी आपणच त्यांची हत्या करावी, असे त्याने ठरविले. त्या दोघांना मारताना कोणीही मध्ये पडू नये यासाठी त्याने दोन बॉम्ब बनविल्याची माहिती पोलिसांनी दिली.

* हवालदार मनोहर फटकुले यांना दहा हजारांचे पारितोषिक
हत्या केल्यानंतर ज्ञानसिंगनेच पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. पण नंतर भीतीने संरक्षक भिंतीवरून उडी मारून पळ काढला. या कारखान्याच्या मागील वस्तीतील संदीप पवार या सुरक्षा रक्षकाने ज्ञानसिंगला पळताना पाहिले आणि त्याने हवालदार मनोहर फटकुले यांना सांगितले. शरीरसौष्ठवपटू असलेल्या फटकुले यांनी ज्ञानसिंगला नि:शस्त्र करून ताब्यात घेतले. याबद्दल त्यांना दहा हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.