मुंबई : मालाड परिसरात एका नऊ वर्षांच्या मुलीवर पित्याने लैगिंक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीच्या आधारे ३० वर्षांच्या आरोपी पित्याविरूद्ध दिडोंशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
२५ वर्षांची तक्रारदार महिला पती आणि नऊ वर्षांच्या मुलीसोबत मालाड परिसरात राहते. जून महिन्यात घरात कोणीही नसताना तिच्या पतीने त्यांच्याच नऊ वर्षांच्या मुलीचा विनयभंग केला. तसेच हा प्रकार कोणालाही सांगू नकोस असे धमकावले. त्यानंतर त्याने अनेक वेळा मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. जूनपासून हा प्रकार सुरूच होता. अलिकडेच पीडित मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला. पित्याकडूनच मुलीवर अत्याचार सुरू असल्याचे समजताच तिला प्रचंड मानसिक धक्का बसला. अखेर सोमवारी रात्री तिने दिडोंशी पोलीस ठाण्यात आरोपी पतीविरूद्ध तक्रार केली. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेतली. या महिलेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरूद्ध ६५ (२), ६८ (अ) भारतीय न्याय सहिता सहकलम ४, १०, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. दिंडोशी पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली.