निशांत सरवणकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनी यांना नृत्य अकादमीसाठी अत्यंत माफक दरात भूखंड देण्याची राज्य शासनाची तयारी असली तरी आता २७ वर्षांनंतरही त्यांना हवा तसा भूखंड सापडलेला नाही. अंधेरी पश्चिमेतील परत केलेला भूखंड त्यांनी आता पुन्हा मागितला आहे. परंतु तोही कांदळवनाच्या विळख्यात अडकल्याने आता पुन्हा नव्या भूखंडाचा शोध सुरू केला आहे.

हेमा मालिनी यांच्या ‘नाटय़विहार कला केंद्र चॅरिटी ट्रस्ट’ला १९९७ मध्ये अंधेरी पश्चिमेतील जुहू-वर्सोवा जोडमार्गावरील हरिप्रसाद चौरसिया यांच्या ‘वृंदावन गुरुकुल’ या अत्यंत मोक्याच्या ठिकाणी १,७४१ चौरस मीटरचा भूखंड वितरित झाला होता. या भूखंडाचा ताबाही त्यांनी घेतला होता, परंतु हा भूखंड सागरी हद्द नियंत्रण कायद्यात येत असल्यामुळे या भूखंडावर बांधकामाला आडकाठी आली होती. त्यामुळे हेमा मालिनी यांनी या भूखंडाऐवजी दुसऱ्या भूखंडाची मागणी केली.

हेही वाचा >>>मुंबईतील डब्बेवाल्यांच्या पाल्यांना नागपुरातून मदतीचा हात…

शासनाने ओशिवरा येथील दोन हजार चौरस मीटरचा भूखंड अवघ्या पावणेदोन लाखांत डिसेंबर २०१५ मध्ये मंजूर केला. त्यामुळे याआधी वितरित करण्यात आलेला जुहू-वर्सोवा लिंक मार्गावरील भूखंड काढून घेण्यात आला. मात्र ओशिवरा येथील भूखंडावर अतिक्रमणे असल्यामुळे या भूखंडाचा ताबा घेणे अशक्य असल्याचे हेमा मालिनी यांनी उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाला कळविले आणि आपल्याला पूर्वी वितरित झालेला जुहू-वर्सोवा लिंक मार्गावरील भूखंड शास्त्रीय संगीत, कला, नृत्य आदींच्या सांस्कृतिक संकुलासाठी मिळावा असा नव्याने अर्ज केला. या भूखंडाचे वितरण मात्र अद्याप रद्द करण्यात आलेले नाही.

जानेवारी २०२२ मध्ये पाठविलेल्या या प्रस्तावावर अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र हा भूखंडही कांदळवनाच्या विळख्यात असल्याचा अहवाल वन विभागाकडून सादर झाल्यामुळे हेमा मालिनी यांच्यापुढे पेच निर्माण झाला आहे. त्यामुळेच त्यांनी ही मागणी रेटून धरलेली नाही. नव्या भूखंडाचा शोध सुरू केला आहे, असे सूत्रांनी सांगितले. याबाबत उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांचा संपर्क होऊ शकला नाही.

हेही वाचा >>>राज ठाकरे आक्रमक होताच मुंबईतील शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळण्याचा निर्णय

विविध संस्थांकडूनही मागणी

हेमा मालिनी यांनी पूर्वी मागितलेल्या भूखंडावर तीन ते चार झोपडय़ा वगळता अतिक्रमण नसल्याचा व हा भूखंड वितरणासाठी उपलब्ध असल्याचा अहवाल तहसीलदारांनी दिला. त्यामुळे हा भूखंड हेमा मालिनी यांनी पुन्हा मागितल्याचा प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी पाठवतानाच हा भूखंड वृंदावन चॅरिटेबल ट्रस्टने ऑगस्ट २०१९ मध्ये उद्यानासाठी, तर स्थानिक आमदार अमित साटम यांनी ‘इंटरनॅशनल आर्ट ऑफ लििव्हग’च्या विकास केंद्रासाठी २०१७ मध्ये मागितला होता, याकडेही लक्ष वेधले.

’हेमा मालिनी यांना पहिल्यांदा वितरित झालेला भूखंड : २९ मार्च १९९७, १७४१ चौरस मीटर, जुहू-वर्सोवा लिंक रोड, अंधेरी पश्चिम. (सद्य:स्थितीत ताबा उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे), 

’दुसऱ्यांदा वितरित झालेला भूखंड : २३ डिसेंबर २०१५, २००० चौरस मीटर, ओशिवरा, आंबिवली (सद्य:स्थितीत ताबा हेमा मालिनी यांच्याकडेच)

२७ वर्षांपूर्वी राज्य सरकारला परत केलेला अंधेरी येथील १,७४१ चौरस मीटरचा भूखंड हेमामालिनी यांनी पुन्हा मागितला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A plot to hema malini for a dance academy at a very modest rate mumbai amy