मुंबई : भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी सध्या जामिनावर असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना नागपूर आणि दिल्ली येथे प्रवास करण्यास विशेष न्यायालयाने सोमवारी परवानगी दिली. चार आठवडय़ांसाठी ही परवानगी देण्यात आली आहे.
देशमुख यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करताना नागपूर येथे जाण्यास मज्जाव केला होता. मात्र त्याचवेळी त्यांना देशांतर्गत प्रवास करायचा असल्यास न्यायालयाची परवानगी घएण्याची पूर्वअट घालण्यात आली होती. त्यानुसार देशमुख यांनी विशेष सीबीआय न्यायालयासह आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) स्थापन विशेष न्यायालयात नागपूर आणि दिल्ली येथे प्रवास करण्याची परवानगी देण्याच्या मागणीसाठी वकील अनिकेत निकम यांच्यामार्फत अर्ज केला होता. दोन्ही न्यायालयाने त्यांची ही मागणी मान्य केली.