मुंबई: गोवरची विशेष लसमात्रा आवश्यकच ;बालरोगतज्ज्ञांचे स्पष्टीकरण | A special dose of measles vaccine is required amy 95 | Loksatta

मुंबई: गोवरची विशेष लसमात्रा आवश्यकच ;बालरोगतज्ज्ञांचे स्पष्टीकरण

बाळाला गोवर रुबेलाची लस एक ते दोन दिवसांपूर्वी दिली असली तरी अतिरिक्त लस मात्रा देता येऊ शकते.

मुंबई: गोवरची विशेष लसमात्रा आवश्यकच ;बालरोगतज्ज्ञांचे स्पष्टीकरण
गोवरची विशेष लसमात्रा आवश्यकच

बाळाला गोवर रुबेलाची लस एक ते दोन दिवसांपूर्वी दिली असली तरी अतिरिक्त लस मात्रा देता येऊ शकते. या मात्रेमुळे बाळावर कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत, तर बाळाला त्याचा फायदाच होणार आहे, असे मत बालरोगतज्ज्ञांनी व्यक्त केले.

काही दिवसांपूर्वीच बाळाला गोवर रुबेला लशीची मात्रा दिली असताना लगेचच पुन्हा लस कशी द्यायची किंवा त्याचे काही दुष्परिणाम होऊ शकतात का, असे अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झाले आहेत. त्यामुळे विशेष लसीकरण मोहिमेअंतर्गत बालकांचे लसीकरण करण्याचे मोठे आव्हान आरोग्य व्यवस्थेसमोर उभे ठाकले आहे.

बाळ जन्माला आल्यापासून त्याला विविध लशी दिल्या जातात. त्या देताना एक मात्रा दिल्यानंतर किमान चार आठवडय़ांनी दुसरी मात्रा दिली जाते. त्यासाठी प्रमाणित कालमर्यादा ठरवण्यात आलेली आहे. मात्र ज्या पद्धतीने पोलिओची लसदेताना लशींच्या वेळापत्रकानुसार बाळाला लस दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला पोलिओची लस देता येते. तीच पद्धत सध्या गोवरच्या लसीकरणांमध्ये अवलंबण्यात येत आहे, असे जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. पल्लवी सापळे यांनी सांगितले.

लसीकरणाची स्थिती..
मुंबई महापालिकेअंतर्गत ९ महिने ते ५ वर्षे वयोगटातील ५१ आरोग्य केंद्रांतील १ लाख ८८ हजार १३ बालकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गेल्या तीन दिवसांत ७ हजार ४१४ बालकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

लसीकरण फायद्याचेच..
गोवर हा विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. हा लसीकरणाने टाळता येणारा आजार आहे. ताप, खोकला, वाहणारे नाक, डोळय़ांची जळजळ, चेहऱ्यावर व शरीरावर लाल, सपाट पुरळ ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. काही मुलांमध्ये अतिसार, कानांचा संसर्ग, न्युमोनिया,
फेफरे, मेंदुसंसर्ग अशी गुंतागुंत निर्माण होऊ शकते, त्यामुळे गोवर रुबेला आजारांना प्रतिबंध करणारे लसीकरण करायला हवे असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

बालकांना लशीची मात्रा दिल्यानंतर दुसरी मात्रा एक महिन्याने देणे आवश्यक आहे. मात्र एखाद्या प्रकरणात गोवर रुबेला लशीची पहिली मात्रा घेऊन काही दिवसांतच अतिरिक्त मात्रा देण्यात येणार असेल तर त्या लशीच्या मात्रेचा कोणताही दुष्परिणाम होणार नाही. तसेच फारसा परिणाम होण्याची शक्यताही कमी आहे. – डॉ. अमोल अन्नदाते, बालरोगतज्ज्ञ

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 03:17 IST
Next Story
मुंबई अग्निशमन दलात लवकरच भरती