मुंबई : घाटकोपर परिसरात रविवारी भरधाव वेगात आलेल्या एका वाहनाने वृद्ध व्यक्तीला धडक दिली. या अपघातात वृद्धाचा मृत्यू झाला. याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरूद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. जितेंद्र गुप्ता (५८) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते घाटकोपरच्या मालवणी चाळ परिसरात राहत होते.
हेही वाचा – मुंबई : अनंत चतुर्दशीच्या दिवशी मध्य रेल्वेवर विशेष लोकल धावणार




हेही वाचा – मुंबई : वंदे भारतमधील प्रवाशांनी घेतला मोदकाचा आस्वाद
विक्रोळीच्या गोदरेज कंपनीत काम करणारे गुप्ता रोज सकाळी पूर्व द्रुतगती मार्गावरून चालत कामावर जात होते. नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी ते कामावर जात असताना भरधाव वेगात आलेल्या वाहनाने त्यांना धडक दिली आणि वाहनचालक वाहन घेऊन पळून गेला. या अपघातात गुप्ता गंभीर जखमी झाले. काही पादचाऱ्यांनी गुप्ता यांचा अपघात झाल्याची माहिती त्यांच्या मुलाला दिली. गुप्ता यांचा मुलगा तत्काळ घटनास्थळी आला आणि त्याने त्यांना राजावाडी रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याबाबत विक्रोळी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.