मुंबई: पोलीस संरक्षण देण्यासाठी शाळेच्या एका संचालकाकडे एका लाख रुपयांची मागणी करणाऱ्या शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. बाबुराव मधुकर देशमुख (५७) असे या अधिकाऱ्याचे नाव असून गेल्या दोन वर्षांपासून ते शिवाजी नगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते.
काही दिवसांपूर्वी गोवंडी परिसरातील एका खासगी शाळेचे कुलूप तोडून काही व्यक्तींनी अनधिकृतपणे प्रवेश केला होता. याबाबत शाळेच्या संचालकाने धर्मादाय आयुक्त आणि शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारदारांनी शाळेत बेकायदेशीरपणे प्रवेश करणाऱ्या व्यक्तींविरोधात कडक कारवाई आणि पोलीस संरक्षण देण्याची मागणी निवेदनाद्वे पोलिसांकडे केली होती. मात्र यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव मधुकर देशमुख यांनी त्यांच्याकडे ३ लाख रुपये लाचेची मागणी केली. अडीच लाख रुपयांवर तडजोड झाल्यानंतर मंगळवारी यापैकी एक लाख रुपयांचा पहिला हप्ता देण्यात येणार होता.
मात्र तक्रारदारांनी यापूर्वीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागात याबाबत तक्रार केली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी एक लाख रुपयांचा पहिला हप्ता घेताना देशमुख यांना मंगळवारी रंगेहात ताब्यात घेतले.