एका लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने चर्चगेटच्या दिशेने जाणारी जलद लोकल सेवा विस्कळीत झाली. दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील चर्चगेटच्या दिशेने येणाऱ्या जलद आणि धीम्या लोकलही दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणारी जलद लोकल गुरुवारी दुपारी १२.५५ वाजता मीरा रोड ते दहिसर दरम्यान बंद पडली. बराच वेळ होऊनही लोकल पुढे जात नसल्याने आणि त्यामागील नेमके कारण प्रवाशांना समजू शकत नसल्याने प्रवाशांनी लोकलमधून उतरून रुळावरून चालत जवळचे स्थानक गाठले. पाऊस आणि त्यात रुळावरून चालत दहिसर स्थानक गाठताना प्रवाशांच्या नाकेनऊ आले. तोपर्यंत या मार्गावरील लोकल चर्चगेट दिशेने जाणाऱ्या धीम्या मार्गावरून वळवण्यात आल्या. त्याचा परिणाम धीम्या लोकलच्या वेळापत्रकावरही झाला.

वेळापत्रकावरही परिणाम –

लोकलमधील बिघाड दुरुस्त करण्यासाठी पश्चिम रेल्वे कर्मचाऱ्यांना अर्धा तास लागला. त्यामुळे डहाणू तसेच विरारहून येणाऱ्या जलद लोकल बरोबरच धीम्या लोकलचे वेळापत्रकही काहीसे विस्कळीत झाले असून लोकल दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावत आहेत.

आसनगाव दरम्यानही लोकल सेवा विस्कळीत –

मध्य रेल्वेवरील आसनगाव दरम्यानही लोकल सेवा विस्कळीत झाली. एलटीटीहून छापराला जाणारी गाडी क्रमांक 11059 दुपारी पाऊणच्या सुमारास आसनगाव स्थानकाजवळच थांबली. या गाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली. इंजिनमधील बिघाड दुरुस्त करण्यासाठी एक तास लागला आणि ही गाडी पुढे रवाना करण्यात आली. त्यामुळे आसनगाव डाउन धीम्या मार्गांवर धावणाऱ्या लोकल उशिराने धावू लागल्या आहेत. याचा फटका या मार्गावरील लोकल प्रवाशांनाही बसला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A technical glitch disrupted the fast local service to churchgate mumbai print news msr
First published on: 30-06-2022 at 14:43 IST