ठाणे ते दिवा पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे काम

मुंबई : ठाणे ते दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या कामासाठी रविवार, २६ सप्टेंबरला कळवा आणि मुंब्रा दरम्यान दहा तासांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येत असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. ब्लॉक सकाळी ८ ते सायंकाळी ६ पर्यंत असेल.

कल्याण येथून सकाळी ७.२७ ते संध्याकाळी ५.४० पर्यंत सुटणाऱ्या अप मार्गावरील धीम्या आणि अर्धजलद उपनगरीय सेवा दिवा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. त्यानंतर पुढे मुलुंड येथे पुन्हा धीम्या मागार्वर लोकल वळविण्यात येतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ८ ते सायंकाळी ५  दरम्यान सुटणाऱ्या आणि सकाळी ९  ते सायंकाळी ५ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आगमन होणाऱ्या सर्व उपनगरीय सेवा गंतव्यस्थानी वेळापत्रकापेक्षा १० मिनिटे उशिराने पोहोचतील. ब्लॉक सुरू होण्यापूर्वी दिवा येथून कळवा आणि मुंब्रा स्थानकांसाठी शेवटची लोकल सेवा सकाळी ७.३८ वा. आणि ब्लॉकनंतर दिवा येथून कळवा आणि मुंब्रा स्थानकांसाठी पहिली उपनगरीय सेवा सायंकाळी ६.०२ वा. सुटेल. या ब्लॉकमुळे साधारण ९० पेक्षा अधिक लोकलफेऱ्या रद्द केल्या जातील. त्यामुळे यादिवशी किमान १०० पेक्षा अधिक जादा बस सोडण्याची मागणी मध्य रेल्वेने राज्य सरकारकडे केली आहे.

प्रत्येक महिन्याला ‘ट्रॅफिक ब्लॉक’

ठाणे ते दिवा पाचवा व सहावा मार्गाच्या कामांना गती दिली जात आहे. विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेऊन रुळांसह अन्य तांत्रिक कामे केली जाणार आहेत. पुढील चार महिने या मार्गाच्या कामांसाठी  पाच तास, तसेच दहा तासांसाठी हे ‘ब्लॉक’ घेण्यात येतील.