मुंबई : गेल्या दीड शतकांत ‘ती’ अनेक अर्थाने बदलली. घराच्या उंबरठय़ाबाहेर पडलेल्या आणि अधिक मोकळेपणाने जगू पाहणाऱ्या या स्त्रीमनाचा हुंकार नाटककारांनीही अचूक पकडला. कधी तरल, कधी प्रखर, कधी कोमल, तर कधी कणखर अशी ‘ती’च्या बदलत गेलेल्या भूमिका रंगमंचीय अविष्कारातून प्रेक्षकांसमोर ठेवणारा ‘लोकसत्ता’चा ‘ती’ची भूमिका हा अनोखा कार्यक्रम गुरुवारी, २३ मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे.
गेली वर्षांनुवर्षे स्त्रियांचे आयुष्य गृहितकांनी वेढलेले आणि समाजाच्या वेगवेगळय़ा चौकटींत बांधलेले आहे. त्या चौकटी मोडण्यासाठीचा संघर्ष, त्यामागचा विचार, ‘ती’च्या भोवतीची सामाजिक विचारांची भिंत, नात्यांची गुंफण याबाबत कालौघात बदलत गेलेले स्त्री विचार मराठी नाटकात उमटले.
नाटककार स्त्रियांनी ‘ती’चा बदलता प्रवास मांडलाच, पण पुरूष नाटककारांच्या नजरेनेही तो टिपला आणि मांडलाही. वेगवेगळय़ा काळातील, वेगवेगळय़ा नाटककारांच्या आठ प्रातिनिधिक नाटकांमधून बदलत गेलेली ‘ती’ची भूमिका रंगमंचावर सादर होणार आहे. २३ मार्चला सायंकाळी ६.३० वाजता दादर येथील शिवाजी मंदिर येथे ‘ती’ची भूमिका हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रम सर्वासाठी मोफत असून त्याच्या प्रवेशिका कार्यक्रमस्थळी सकाळी ८.३० ते ११ आणि सायंकाळी ५ ते ८ या वेळेत उपलब्ध आहेत.
आठ नाटय़ाविष्कारांमधील स्त्री भूमिकांची एकत्रित गुंफण अभिनेत्री शिल्पा तुळसकर सूत्रसंचालनातून करणार आहेत. या कार्यक्रमाचे संहिता लेखन मुग्धा गोडबोले यांनी केले असून संयोजन उत्तरा मोने यांच्या मिती क्रिएशन्स या संस्थेने केले आहे. प्रकाशयोजना शीतल तळपदे यांची तर नेपथ्य प्रसाद वालावलकर यांचे आहे.
सादरीकरण.
विभावरी देशपांडे, अदिती देशपांडे, सारिका नवाथे, भार्गवी चिरमुले, राधिका हर्षे, शर्वरी पाटणकर, हेमांगी कवी, सुप्रिया मतकरी, प्रमोद काळे, अधोक्षज कऱ्हाडे, अभिषेक साळवी, रोहित माळवे.
संकल्पना..
या कार्यक्रमात महेश एलकुंचवार लिखित ‘आत्मकथा, विजय तेंडूलकर लिखित ‘बेबी’ , सई परांजपे लिखित ‘जास्वंदी’, व्यंकटेश माडगुळकर लिखित ‘पती गेले ग काठेवाडी’, मेधावी नातू यांनी नाटय़रुपांतर केलेल्या ‘डॉ. आनंदीबाई’, चेतन दातार लिखित ‘सावल्या’, संजय पवार लिखित ‘ठष्ठ’ आणि रत्नाकर मतकरी लिखित ‘इंदिरा’ अशा आठ नाटकांमधील प्रवेश सादर केले जाणार आहेत.
या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य आहे. एका व्यक्तीसाठी एक प्रवेशिका उपलब्ध होईल. काही जागा निमंत्रितांसाठी राखीव ठेवण्यात येतील. प्रवेशिका सकाळी ८.३० ते ११ आणि सायंकाळी ५ ते ८ या वेळेत कार्यक्रमस्थळी मिळतील.
मुख्य प्रायोजक: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ
सहप्रायोजक: एम. के. घारे ज्वेलर्स,वीणा वल्र्ड,उज्ज्वला हावरे लेगसी
बँकिंग पार्टनर: एनकेजीएसबी को-ऑपरेटिव्ह बँक लि.
कधी ? :२३ मार्च, सायंकाळी ६.३० वाजता.
कुठे ?: शिवाजी मंदिर, दादर