मुंबई : एखादा मनोरुग्ण बरा झाला तरी बहुतेकवेळा कुटुंबातील लोकांना तो नकोसा असतो. त्याची जबाबदारी घेण्यास कोणी तयार होत नाही. परिणामी उपचारानंतर बरे होऊनही अशा रुग्णांना मनोरुग्णालयातच सक्तीने राहावे लागते. घरातील मनोरुग्णाला मनोरुग्णालयात दखल केलं की, आपले कर्तव्य संपले असाच बहुतेकांचा समज असतो. त्यामुळे वर्षानुवर्षे मनोरुग्णालयात बरे झालेले अनेक रुग्ण बघायला मिळतात. गंभीर बाब म्हणजे रुग्णालय प्रशासनाही याबाबत ठोस पावले उपचलताना दिसत नाही. मात्र ठाणे मनोरुग्णालय याला अपवाद ठरले आहे. तेथील डॉक्टर- कर्मचाऱ्यांनी केवळ रुग्णाच्या नातेवाईकांनाच शोधले नाही तर त्यांना योग्य प्रकारे समजावून तब्बल २७ वर्ष ठाणे मनोरुग्णालयात उपचार घेणाऱ्या महिलेला तिच्या हक्काच्या घरी पाठवले.
वीणा नाईक, वय ४५ (नाव बदलून) काहीशी गतिमंद आणि मानसिक रोगी असल्याने तीला सप्टेंबर १९९७ ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात दखल करत्यात आले. काही काळाच्या उपचारानंतर तीच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे वीणाच्या कुटुंबियांनी घरी घेऊन जाणे अपेक्षित होते. मात्र कुटुंबीय नेण्यासाठी टाळाटाळ करत होते. पहिले काही दिवस जयश्रीचा भाऊ आई बघून विचारपूस करायचे. परतू नंतर सर्वांनीच येणं बंद केलं. रुग्णालयाने कुटुंबाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परतू संपर्कासाठी दिलेला मोबाईल क्रमांक आणि पत्ता सर्वच बदलून गेल होत. त्यामुळे वीणाला तिच्या कुटुंबियांशी भेट करून देणे अवघड गोष्ट झाली होती.
ठाणे मनोरुग्णालय वीणाच्या कुटुंबीयांना सातत्याने शोधण्याचा प्रयत्न करत होते. परतू काहीच उपयोग होत नव्हता. काही महिन्यांपूर्वी तिची आई जामनेर भागात रहात असल्याचे रुग्णालयाच्या समाजसेवा विभागाला समजले. त्यानुसार पोलिसांच्या मदतीने आईशी संपर्क साधला. यावेळी आईने मुलीला सांभाळू शकत नाही असे सांगून तीला घरी नेण्यास असमर्थता दर्शवली. आईच्या चौकशीत वीणाचे दोन भाऊ मुंबईत राहत असल्याची माहिती रुग्णालयाला मिळाली. त्यानुसार रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयाच्या समाजसेवा अधिक्षक विभागाने उल्हासनगर परिसरात शोध घेतला. काहीशा दाटीवायीच्या भागात वीणाच्या भावांचा शोध घेताना तारेवरची कसरत करावी लागल्याो रुग्णालय समाजसेवा अधिक्षक ब्रम्हदेव जाधव यांनी सांगितले.
भावांनी देखील वीणाला घरी नेण्यासाठी असमर्थता दर्शवली होती. परंतु दोन्ही भावांचे समुपदेशन रुग्णालयाने केलं. त्यांना येणाऱ्या अडचणी जाणून त्यामधून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे जवळपास २७ वर्षांनी वीणा आज आपल्या घरी गेली आहे. उपअधीक्षक डॉ ममता आळसपुरकर, वार्ड मनोविकर तज्ञ डॉक्टर प्रज्ञा कासार, परिसेविका रीना वासुदेव, मनोरुग्ण तज्ञ परिचारिका कृपा गोडविंदे, व्यवसाय उपचार तज्ञ डॉ. आश्लेषा कोळी या टीमने सहकार्य केले.
२०१७ च्या मानसिक आरोग्य कायद्यानुसार बरे झालेल्या मनोरुग्णाला कुटुंबात पाठविणे आवश्यक असते, किंवा कमी निर्बंध असलेल्या वातावरणात पाठवणे आवश्यक आहे. कुटुंबात राहणे व सामाजिक जीवन जगणे हा त्यांचा हक्क आहे. तो मिळवून देण्याच्या हेतूने प्रयत्न केल्याचे वैद्यकीय अधीक्षक, ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय डॉ. नेताजी मुळीक यांनी सांगितले. खरेतर हे आमच्यासाठी एक आव्हान असते. अनेकदा नातेवाईक रुग्णाला घरी नेण्यासाठी तयार नसतात. कायदेशीर कारवाईचा धाक दाखवला तरीही नातेवाईक वेगवेगळी कारणे पुढे करतात.
काही प्रकरणात घरातील मंडळी वृद्ध असल्याने आम्ही सांभाळ करू शकत नाही, असे कारण पुढे करतात. असेही आज कुटुंबव्यवस्था मोडीत निघाली आहे. नवरा-बायको व मुल एवढ्यापुरतेच कुटुंब अशी व्यख्या आता तयार झालेली दिसत असताना नमोरुग्ण असलेल्या बहिण वा आई-वडिलांना कोण घरी नेणार. यापूर्वीही अशा काही बऱ्या झालेल्या रुग्णांना आम्ही त्यांच्या घरी सोडले आहे. कुटुंबातील सदस्यांना लागेल ते सहकार्य करण्याची हमी आम्ही देतो तसेच योग्यप्रकारे त्यांचे समुपदेशन करतो. परिणामी वीणा सारख्या बऱ्या झालेल्या रुग्णांना त्यांच्या हक्काचे घर मिळते असे डॉ मुळीक म्हणाले.