मुंबई: पश्चिम रेल्वेवरील नव्या एसी लोकलसाठी वर्षभराची प्रतिक्षा | A year long wait for new AC local on Western Railway mumbai print news amy 95 | Loksatta

मुंबई: पश्चिम रेल्वेवरील नव्या एसी लोकलसाठी वर्षभराची प्रतिक्षा

तिकीट दरात कपात केल्यानंतर पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलला प्रतिसाद वाढू लागला असून पश्चिम रेल्वेला फेऱ्यामध्ये वाढ करण्यासाठी आणखी काही वातानुकूलित लोकलची गरज आहे.

मुंबई: पश्चिम रेल्वेवरील नव्या एसी लोकलसाठी वर्षभराची प्रतिक्षा
(संग्रहित छायाचित्र)

सुशांत मोरे

तिकीट दरात कपात केल्यानंतर पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलला प्रतिसाद वाढू लागला असून पश्चिम रेल्वेला फेऱ्यामध्ये वाढ करण्यासाठी आणखी काही वातानुकूलित लोकलची गरज आहे. मात्र तूर्तास पश्चिम रेल्वेला वातानुकूलित लोकल मिळण्याची शक्यता नाही. मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून (एमआरव्हीसी) एमयूटीपी ३ आणि ३ ए अंतर्गत पश्चिम रेल्वेला तब्बल २०० वातानुकूलित लोकल उपलब्ध होणार आहेत. मात्र या लोकल टप्प्याटप्याने ताफ्यात येणार असून त्यासाठी वर्षभराहून अधिक कालावधी लागणार आहे, असे एमआरव्हीसीकडून पश्चिम रेल्वेला कळविण्यात आले आहे.

हेही वाचा >>>मुंबई: विजय केंकरे यांचे रंगभूमीवर शतक; ‘काळी राणी’ नाटकाचा ११ डिसेंबर रोजी प्रयोग

रेल्वेने ५ मेपासून वातानुकूलित लोकलच्या तिकीट दरात ५० टक्के कपात केली असून त्यानंतर पश्चिम रेल्वेवरील या सेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. एप्रिलमध्ये ५६ हजार २१ तिकीट आणि ११ हजार ९५४ पासची विक्री झाली होती. ऑक्टोबरमध्ये एकूण चार लाख ९८ हजार तिकीट आणि ३१ हजार २२४ पासची विक्री झाली. नोव्हेंबरमध्येही यात वाढ झाली आहे. सध्या पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात सहा वातानुकूलित लोकल असून त्यात्या दररोज ७९ फेऱ्या होतात.

‘वातानुकूलित लोकलला सध्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र वातानुकूलित लोकलची संख्या लक्षात घेता फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात अडचणी येत आहेत. एमआरव्हीसीकडून एमयूटीपी ३ आणि ३ ए अंतर्गत मध्य आणि पश्चिम रेल्वेला २९१ वातानुकूलित लोकल उपलब्ध करण्यात येणार आहेत. यापैकी किमान २०० लोकल पश्चिम रेल्वेला मिळतील, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक नीरज वर्मा यांनी दिली. बहुतांश लोकल या पश्चिम रेल्वेलाच मिळणार आहेत. मात्र त्या मिळण्यासाठी एक वर्षाहून अधिक कालावधी लागेल असे एमआरव्हीसीकडून कळविण्यात आल्याचे वर्मा यांनी सांगितले. त्यामुळे सध्या ताफ्यातील वातानुकूलित लोकलच्याच फेऱ्या वाढण्याचा विचार करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

हेही वाचा >>>मुंबई महानगरपालिकेची प्रभागसंख्या कमी करण्याच्या कायद्याला आव्हान; राज्य सरकारचा उच्च न्यायालयात दावा

प्रवासी वाहून नेण्याची क्षमता वाढावी यासाठी मोटरकोच डब्यातील उपकरणे लोकलच्या डब्याखाली बसविलेली पहिली वातानुकूलित लोकल पश्चिम रेल्वेवर दाखल होणार आहे. मात्र ही लोकल तांत्रिक कारणामुळे आणि रेल्वे बोर्डाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत अडकली आहे. ही लोकलही ताफ्यात दाखल झाल्यानंतर ती राखीव म्हणूनच ठेवण्याचा विचार आहे.

वातानुकूलित लोकल मंजुरीच्या प्रतीक्षेत

एमआरव्हीसीकडून उपनगरीय प्रवाशांसाठी एमयूटीपी ३ आणि ३ ए अंतर्गत भविष्यात मेट्रो प्रकारातील अत्याधुनिक अशा २३८ वातानुकूलित लोकल उपलब्ध करण्यात येणार आहेत. मात्र रेल्वे बोर्डाकडून निविदा आणि तांत्रित तपशीला मंजुरी मिळालेली नाही. मंजुरी मिळताच निविदा जारी करण्यात येतील. खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने २३८ लोकल ताफ्यात दाखल होतील.

हेही वाचा >>>फुकट्यांचा प्रथम श्रेणी, वातानुकूलित प्रवाशांना ताप; विशेष मोहिमेत ३७९ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई

पासदर कमी करा
पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक नीरज वर्मा यांनी मंगळवारी लोकल प्रवास करून प्रवाशांशी सवांद साधला. यावेळी लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यातील आणि वातानुकलित डब्यातील अन्य प्रवाशांची घुसखोरी रोखा, प्रवास सुकर करण्यासाठी लोकल फेऱ्या वाढवा, स्थानकातील स्वछतागृहाची नियमित साफसफाई करावी आदी मागण्या प्रवाशांनी केल्या. तसेच वातानुकूलित लोकलचे पास दरही कमी करावे, अशीही मागणी प्रवाशांनी केली. मात्र वातानुकूलित लोकलचे तिकीट आणि पासदर खूपच कमी असून ते कमी करणे अशक्य असल्याचे वर्मा म्हणाले. वातानुकूलित लोकलमध्ये विनातिकीट किंवा सामान्य तिकिटावर प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी प्रत्येक लोकलमध्ये दोन – तीन तिकीट तपासनीस नेमण्यात आले आहेत. तिकीट तपासनीस नसल्यास विशेष मोहिमेद्वारेही कारवाई करण्यात येत असल्याची माहिती वर्मा यांनी दिली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 15:54 IST
Next Story
मुंबई: विजय केंकरे यांचे रंगभूमीवर शतक; ‘काळी राणी’ नाटकाचा ११ डिसेंबर रोजी प्रयोग