मुंबई : मध्य रेल्वेवरील नेरळ स्थानकाजवळ रूळ ओलांडताना एका १९ वर्षीय तरुणाला एक्स्प्रेसने जोरदार धडक दिली. ही घटना रविवारी रात्री ११ च्या सुमारास घडली. या घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला. पण अपघातामुळे एक्स्प्रेसच्या इंजिनाचेही मोठे नुकसान झाले. त्यामुळे ब्रेकिंग यंत्रणा निकामी झाली. मृत शरीर रेल्वे रूळावरून उचलून इंजिनाची अदलाबदल करणे, महत्त्वाच्या दुरुस्त्या करण्यात मध्य रेल्वेला बराच कालावधी लागला. त्यानंतर तब्बल चार तासांनी एक्स्प्रेस पुन्हा मार्गस्थ करण्यात आली.
रविवारी रात्री ११ च्या सुमारास नेरळ स्थानकादरम्यान रोहित शिंदे (१९) हा तरुण रूळ ओलांडत होता़ मात्र त्याचवेळी एक्स्प्रेस येत असल्याचा अंदाज न आल्याने त्याला एक्स्प्रेसची धडक लागली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाला मिळताच घटनास्थळी अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले. या अपघातात एक्स्प्रेसच्या इंजिनचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे पर्यायी इंजिन आणून या एक्स्प्रेसला येथून मार्गस्थ करण्यात बराच वेळ लागला. रात्री २ वाजेच्या सुमारास पर्यायी इंजिन आणून एक्स्प्रेस कर्जत दिशेकडे रवाना झाली, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.रोहित हा मूळचा मध्य प्रदेशमधील असून त्याचे आई-वडील रेल्वे रुळावर खडी टाकण्याच्या कंत्राटी कामासाठी मुंबईत आले होते, अशी माहिती कर्जत रेल्वे पोलिसांनी दिली.