महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून संघर्ष तीव्र झाला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोलापूर आणि सांगलीतील काही गावांवर दावा सांगितला. त्यानंतर महाराष्ट्रातील मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री शंभूराज देसाई आज ( ६ नोव्हेंबर ) बेळगाव दौऱ्यावर जाणार होते. पण, कर्नाटक सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे हा दौरा रद्द केल्याची माहिती शंभूराज देसाई यांनी दिली. यावरून शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार आदित्य ठाकरेंनी टीका करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही लक्ष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आदित्य ठाकरेंनी ट्वीट केलं आहे. त्यात म्हटलं की, “एका बाजूला शेतकरी त्रस्त आहेत. महिलांवर अत्याचार वाढत आहेत. उद्योग महाराष्ट्रातून एका राज्यात पाठवलेत. आता आपल्या महाराष्ट्राची गावं दुसऱ्या राज्यात पळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण, घटनाबाह्य मुख्यमंत्री मात्र ह्या सगळ्यावर गप्प का? कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या दमदाटीला घाबरून महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकारचे मंत्री तंतरले आणि दौरा स्थगित करून बसले. ही अखंड महाराष्ट्रासाठी शरमेची, दुःखाची गोष्ट आहे.”

हेही वाचा : महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक झाल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना इशारा, म्हणाले “जर उद्या…”

“महाराष्ट्रधर्माशी केलेली गद्दारी आहे! स्वतःसाठी दुसऱ्या राज्यात पळून गेले, पण महाराष्ट्रासाठी बेळगावला जात नाहीत? राग ह्या गोष्टीचा येतो की, खरंतर जो विषय चर्चेचा नाही त्यावर चर्चा करायला निघाले होते, पण कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दम देताच आपले मंत्री घाबरून तिथे गेलेच नाहीत. एवढं हतबल सरकार महाराष्ट्रात कधीच नव्हतं!,” असेही आदित्य ठाकरेंनी आपल्या ट्वीटमध्ये सांगितलं आहे.

हेही वाचा : “…नाहीतर मला बेळगावात जावं लागेल”, शरद पवारांचा कर्नाटक सरकारला ४८ तासांचा वेळ

दरम्यान, बेळगावात महाराष्ट्रातील ट्रकवर दगडफेक करण्यात आली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटक सरकारला २४ तासांचा वेळ दिला आहे. “महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन परिस्थिती निवळण्यासाठी प्रयत्न केलं पाहिजे. पुढील २४ तासांत परिस्थिती निवळली पाहिजे. नाहीतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यासाठी जबाबदारी राहतील. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून चिथावणीखोर भूमिका जर घडत असेल, तर देशाच्या स्थैर्याला मोठा धक्का असेल. केंद्र सरकारने बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही,” अशी कानउघडणी शरद पवार यांनी केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aaditya thackeray attacks cm eknath shinde over maharashtra karnatak border issue ssa
First published on: 06-12-2022 at 18:13 IST