मुंबई… मुलुंडची एक इंचही जागा कोणालाही दिलेली नाही, देणार नाही, असे भाजपचे आमदार मिहिर कोटेचा यांनी मुलुंडकरांची मोठी फसवणूक केली आहे. एक इंचही जागा देणार नाही म्हणता म्हणता भाजपने मुलुंडमधील कित्येक एकर मोकळी जागा विकासाच्या नावाखाली खासगी विकासकांच्या घशात घातल्या आहेत. मुलुंडकरांची दिशाभूल केली आहे. तेव्हा अशा फसवणूक करणाऱ्या, दिशाभूल करणाऱ्या आमदारांना खुर्चीवरून खाली खेचा, असे म्हणत शिवसेना (ठाकरे गट) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मिहिर कोटेचा यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
मुलुंड पूर्व रेल्वे स्थानक येथे रविवारी सायंकाळी ६ वाजता आदित्य ठाकरे यांची सभा झाली. यावेळी मिहिर कोटेचा यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहिमेची आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. आता ५० हजार स्वाक्षऱ्यांचे लक्ष्य पूर्ण करून स्वाक्षरीचे पत्र राज्यपालांकडे पाठविण्यात येणार असल्याचे यावेळी आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
मुंबईतील मोकळ्या जागा भाजपकडून बळकावल्या जात असल्याचा आरोप करून आदित्य ठाकरे यांनी याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. तर आता मुलुंडमधील मोकळ्या जागा वाचविण्यासाठी आदित्य ठाकरे रस्त्यावर उतरले. रविवारी मुलुंड रेल्वे स्थानक पूर्व येथे त्यांनी एक सभा घेत भाजपवर आणि आमदार मिहिर कोटेचा यांच्यावर टीका केली. या सभेत त्यांनी मुलुंडमधील मोकळ्या जागा कशा विकासकांच्या घशात घातल्या जात आहेत, भाजपकडून, स्थानिक आमदारांकडून कशी मुलुंडकरांची फसवणूक केली जात आहे, मुलुंडकरांनी कशी खोटी आश्वासने दिली जात आहेत, याचे एक सादरीकरणच यावेळी त्यांनी केले. तर लावा रे तो व्हिडिओ म्हणत मिहिर कोटेचा यांनी मुलुंडबाबत केलेली वक्तव्ये आणि प्रत्यक्षातील त्यांची कृती यात कसा फरक आहे, हे व्हिडीओद्वारे मुलुंडकरांना दाखवून दिले.
मुलुंडमधील जागा बळकावल्या जात असल्याच्या आरोपावर काही महिन्यांपूर्वी कोटेचा यांनी अधिवेशनात मुलुंडची एक इंचही जागा कोणाला दिली जाणार नाही, असे भाष्य केले होते. पण प्रत्यक्षात मात्र मुलुंडमधील किती आणि कोणत्या जागा बळकावल्या गेल्या आणि या जागांचा विकास झाल्यानंतर पर्यावरणाला कसा धक्का बसणार, मुलुंडमधील पायाभूत सुविधांवर कसा ताण येणार, हेही त्यांनी या सादरीकरणातून मुलुंडकरांसमोर मांडले.
मुलुंड पूर्व येथे ७५०० प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन केले जात आहे. तर मिठागराची ४८ एकर जागा धारावीतील अपात्र रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी धारावी पुनर्विकास प्रकल्पास (डीआरपी) देण्यात आली आहे. आणखी काही एकर जागा लवकरच डीआरपीला दिली जाणार आहे. तसेच क्रीडा संकुलासाठीच्या आरक्षित भूखंडावर पेट्रोल पंपाचा घाट घातला आहे. त्यासाठी भूखंडाचे आरक्षण बदलण्यात येणार आहे. त्याचवेळी मुलुंड हरी ओम नगर येथील कचराभूमीवर (डम्पिंग ग्राऊंड) गोल्फ कोर्स उभारण्याची मागणी आमदारांनी केली असून त्याची घोषणाही त्यांनी केली आहे. तब्बल ६४ एकरांच्या भूखंडावर उच्चभ्रू लोकांच्या फायद्यासाठी गोल्फ कोर्स उभारला जात आहे.
विविध प्रकल्पांच्या नावाखाली मुलुंडमधील मोकळ्या जागा बळकावल्या जात असून दुसरीकडे आमदार मात्र मुलुंडकरांची दिशाभूल करत आहेत, मुलुंडकरांची दिशाभूल करत आहेत. त्यामुळे अशा आमदारांचा आम्ही आता राजीनामा घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे म्हणत शिवसेनेने (ठाकरे गट) मिहिर कोटेचा यांच्याविरोधात राजीनामा स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. रविवारी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या मोहिमेस सुरुवात झाली आहे. लवकरच ५० हजार स्वाक्षऱ्यांचे उद्दिष्ट पूर्ण करून स्वाक्षऱ्यांचे पत्र राज्यपालांकडे सादर करत मुलुंड वाचविण्याची, मोकळ्या जागा वाचविण्याची मागणी केली जाणार असल्याचेही यावेळी आदित्य ठाकरे यांनी सांगितले. मुलुंडकरांची फसवणूक करणारा आमदार नको, मुलुंडला काम करणारा आणि मुलुंडकरांच्या हक्कांसाठी लढणारा आमदार हवा, हीच आता मुलुंडकरांची भूमिका असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
