अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि त्याची माजी मॅनेजर दिशा सालियन या दोघांच्या संशयास्पद मृत्यूमुळे बॉलिवूडमध्ये मोठ्या प्रमाणावर उलथापालथ दिसून आली. बॉलिवूडमधील घराणेशाही आणि ड्रग्ससेवन या दोन प्रमुख विषयांभोवती सगळ्या चर्चा रंगल्या. मुंबई पोलिसांनी सुशांत सिंग मृत्यू प्रकरणात हलगर्जीपणा केला असल्याचा आरोप नेटिझन्स आणि काही नेतेमंडळींनी केला. तसेच, दिशा सलियन मृत्यू प्रकरणात शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर भाजपा खासदार नारायण राणे यांनी आरोप केले. या साऱ्या प्रकरणावर आदित्य ठाकरे यांनी इतके दिवस मौन बाळगले होते, पण नवभारत टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत अखेर आदित्य यांनी या प्रकरणांवर मौन सोडलं.

राष्ट्रवादीचे जयंत पाटील भाजपात येणार? चंद्रकांत पाटील यांचं सूचक उत्तर

आदित्य ठाकरे यांनी बॉलिवूडमधील विविध वाद, त्यात मुंबई पोलिसांवर झालेले आरोप-प्रत्यारोप आणि त्यातच त्यांच्या नावाचाही झालेला समावेश या साऱ्या मुद्द्यावर भाष्य केले. “आता जे लोक विरोधी पक्षात बसले आहेत, ते जेव्हा सत्तेत होते तेव्हा त्यांना हेच सर्व जण (बॉलिवूड कलाकार आणि मुंबई पोलिस) चांगले वाटत होते. कलाकारांना विशेष विमानाने दिल्लीला कार्यक्रमांसाठी नेल जात असे. केंद्रातील सत्ताधाऱ्यांसाठी गाणी गाऊन घेतली जात होती. त्यांच्याशी चांगले संबंधही प्रस्थापित करण्यात आले होते. पण जेव्हापासून त्यांच्या हातून राज्यातील सरकार गेलं, तेव्हापासून त्यांना हे कलाकार मंडळी आणि मुंबई पोलीस वाईट स्वभावाचे वाटू लागले आहेत”, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

“थोरातांचे ‘ते’ वक्तव्य म्हणजे आहेराचं पाकिट नसतानाही जेवणाच्या आशेने चोरून लग्नात जाण्यासारखं”

“बॉलिवूड, मुंबईचे लोक आताच्या विरोधकांना चांगले वाटत नाहीत. मुंबईला आता अचानक ड्रग्जचं सेंटर म्हणलं जाऊ लागलं आहे. सत्तांतर झाल्यामुळे कदाचित आताच्या विरोधकांच्या चष्म्याचा नंबरही बदललेला दिसतोय. त्यांच्या पोटात आता दुखायला लागलं आहे. राज्याची प्रगती त्यांच्या डोळ्यात खुपत आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात होणाऱ्या प्रत्येक चांगल्या कामांमुळे त्यांना बहुतेक वाईट वाटत आहे. म्हणूनच ते आता प्रत्येक वेळी आरोप करत सुटले आहेत. भाजपाचे लोक मला घाबरतात म्हणूनच माझ्यावर अशाप्रकारे टीका केली जात आहे”, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी विरोधकांचा समाचार घेतला.