मुंबई : उपकरप्राप्त इमारतीमधील रहिवाशांना विकासक भूलथापा देऊन घरे खाली करण्यास भाग पाडण्याची शक्यता असल्याने त्यांना भोडकरुचा दर्जा द्यावा. तसेच नव्याने होणाऱ्या पोलीस वसाहतीमध्ये विद्यमान आणि निवृत्त पोलीसांना ६०:४० प्रमाणात घरे राखीव ठेवण्यात यावी, अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे युवानेते आमदार आदित्य ठाकरे यांंनी शनिवारी ‘मातोश्री’ निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबईत १४ हजार ५०० चाळी- इमारती पागडीच्या आहेत. त्या इमारती ६० ते १०० वर्षे जुन्या आहेत. काही ठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे या इमारतींना दुरुस्ती आणि पुनर्विकासाची गरज आहे. महाविकास आघाडीच्या काळात या इमारतींच्या पुनर्विकासाबाबत २०२१ मध्ये कायदा आणला होता. हा पारदर्शक कायदा होता. मात्र, राज्यपालांच्या सहीमुळे तो अमलात आला नाही. काही जागामालक न्यायालयात गेले. सक्षम प्राधिकरण कोण, असा त्यांचा मुद्दा होता. त्याचा लढा सुरू आहे. 20 जुलै रोजी त्यासंदर्भात अखेरची सुनावणी होणार आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
जुन्या इमारतींच्या पुनर्विकास संदर्भात परवा हा कायदा मंजूर झाला. मात्र, खटल्याचा निकाल लागलेला नाही. त्यामुळे रहिवाशांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये. आपली घरे सोडू नयेत. कायदा पारित झाला पण निकाल लागायचा आहे. तुमच्याकडे जागा मालक येतील, घर सोडून जा म्हणतील, पण तुम्ही घर सोडून जाऊ नका. अन्यथा तुमचा घरावरचा हक्क जाईल. असे होवू नये म्हणून सरकारने त्या रहिवाशांना भाडेकरुचा दर्जा द्यावा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले.
मुंबईतील पागडी पद्धतीने राहणाऱ्या रहिवाशांना जागा मालक धमकावत आहेत. त्यांना नोटीसा पाठवत आहेत. मोडकळीस आलेली घरे रिकामी करताना रहिवाशांच्या निवासाची सोय करण्यात यावी. अनेक इमारती शिवण म्हणजे धोकादायक परिस्थितीत आहेत. त्यामध्ये राहणाऱ्या रहिवाशांना सुरक्षिततेसाठी स्थलांतर करणे आवश्यक आहे, मात्र या रहिवाशांचा घरावरील हक्क जाता कामा नये. याची सरकारने काळजी घ्यावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.
निवृत्त पोलिसांना आरक्षण ठेवा :
पोलीस वसाहतीमधील नवी घरे विद्यमान पोलीस आणि निवृत्त पोलीस यांना ६० : ४० प्रमाणत राखीव ठेवण्यात यावी. अन्यथा मुंबईचे ३० वर्षे रक्षण केलेला पोलीस या शहराबाहेर फेकला जाईल. असे होवू नये म्हणून निवृत्त पोलीसांचा नव्या पोलीस वसाहतीमध्ये हक्क ठेवण्यात यावा, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
