Aaditya Thackeray On Metro Pillar Collapse : मुंबईमधील वडाळा-ठाणे कासारवडवली मेट्रो ४ या मार्गिकेच्या कामाच्या दरम्यान मुंबई मेट्रोचं काम सुरू असताना मुलुंडजवळ शनिवार दुपारी मेट्रोच्या खांबाचा काँक्रीट स्लॅब उंचावरून खाली कोसळला. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून तिघे जखमी झाले आहेत.

जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती सांगितली जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर शिवसेना (ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत भाजपाच्या सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘भाजपाच्या राजवटीत जीवाची काहीच किंमत नाही’, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

“आज बांधकामाधीन मेट्रो ४ मार्गाचा काँक्रीट स्लॅब (पॅरापेट) उंचावरून खाली एका रिक्षा आणि एका कारवर कोसळला. याचप्रमाणे गेल्या वर्षी एक भिंत कोसळली होती आणि तत्कालीन नव्याने उद्घाटन झालेल्या मेट्रो मार्ग ३ मध्ये पावसाचे पाणी भरले होते. सरकार या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकेल का? कदाचित नाही. कदाचित काही लाखांचा दंड दाखवेल आणि कंत्राटदाराला आणखी निविदा देईल”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

“तुमच्या लक्षात आलंच असेल की काम पूर्ण होण्यापूर्वीच खांब रंगवलेले आहेत. यासाठी राज्याला काही कोटींचा खर्च येतो. आता नंतर काम पूर्ण झाल्यावर तेच पुन्हा करण्यासाठी कोट्यवधी रुपये लागतील. आजही बहुतेक पायाभूत सुविधांच्या कामांमध्ये खूप बॅरिकेडिंग आहेत, ज्यामुळे वाहतूक कोंडी होते किंवा वाहने उघड्या खड्ड्यात पडतात. भाजपा राजवटीत जीवनाचे काही मूल्य नाही. मेट्रो मार्गावरून पडणारे तुकडे, वाहतुकीचे असुरक्षित मार्ग, तासंतास मदतीशिवाय कार/बाईक खड्ड्यात पडणे, किती लाजिरवाणी गोष्ट आहे”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर केली आहे.

एमएमआरडीएने काय म्हटलं?

“आज दुपारी १२:१५ वाजण्याच्या सुमारास, मुलुंड अग्निशमन केंद्राजवळील RAJV (मिलन) परिसरात सुरू असलेल्या मेट्रो मार्गाच्या बांधकामादरम्यान पियर क्रमांक P१९६ जवळ एका अपघाताची घटना घडली. उंचावरून पॅरापेटचा एक भाग खाली पडून तो तेथून जात असलेल्या रिक्षावर आदळला. या घटनेत दोन जण जखमी झाले असून त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती लक्षात घेऊन आवश्यक ती सर्व वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली जात आहे. मेट्रो प्रकल्पाची टीम घटनास्थळी उपस्थित असून @mybmc, मुंबई अग्निशमन दल, मुंबई ट्रॅफिक पोलीस व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांच्या समन्वयाने मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे”, असं एमएमआरडीएने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.