उर्मिला मातोंडकरांच्या शिवसेना प्रवेशावर आदित्य ठाकरे म्हणतात…

‘मातोश्री’वर मंगळवारी दुपारी झाला पक्षप्रवेश

बॉलिवूडमधील मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी मंगळवारी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत उर्मिला मातोंडकर यांनी हातावर शिवबंधन बांधत नव्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आहे. राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. त्याआधी उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

बॉलिवूडमधील वादात नाव जोडण्याबाबत आदित्य ठाकरेंनी सोडलं मौन, म्हणाले…

उर्मिला यांच्या पक्षप्रवेशावर राज्याचे युवा मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपलं मत व्यक्त केलं. “उर्मिला मातोंडकर यांचं सर्वच शिवसैनिक स्वागत करत आहेत. महाराष्ट्रात विविध लोकोपयोगी कार्यात त्यांचा सहभाग असेल याची खात्री आहे. आपल्या राज्यासाठी त्या नक्कीच चांगलं काम करतील. पक्षप्रवेशाच्या वेळी आमची भेट झाली. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचा खरोखरच आनंद आहे. त्यांना चांगलं काम करण्यासाठी शुभेच्छा!”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

दरम्यान, पक्षप्रवेशानंतर उर्मिला यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या भावना व्यक्त केल्या. “सिनेसृष्टीत कारकीर्द सुरु केली, तेव्हा मी साध्यासुध्या मराठी घरातून आलेली मुलगी होते. मी ‘पिपलमेड’ स्टार आहे, त्याचप्रमाणे आता मला ‘पिपलमेड लीडर’ व्हायला आवडेल. करोनाच्या कठीण काळात महाविकास आघाडीने खूप चांगलं काम केलं आहे. शिवसेना प्रवेशासाठी माझ्यावर कोणताही दबाव नव्हता. शिवसेनेच्या भक्कम अशा महिला आघाडीचा मी एक भाग झाले याचा मला सार्थ अभिमान आहे. काँग्रेसमध्ये होते तेव्हाही मला पदाची अपेक्षा नव्हती. आज शिवसेनेत आले तरीही पदाची अपेक्षा नाही. मला लोकांसाठी काम करायचं आहे आणि शिवसैनिक म्हणून मी शिवसेनेत काम करणार आहे”, असे उर्मिला मातोंडकर म्हणाल्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Aaditya thackeray reaction bollywood marathi star actress urmila matondkar joining shivsena uddhav thackeray sanjay raut vjb